Sunday, 9 October 2016

Myristica swamps - निरंकाराची राई (एक अद्भुत ठिकाण)

निसर्ग संवर्धनासाठी पारंपरिक सामाजिक बंधनाचा यशस्वी मार्ग - निरंकाराची राई (एक अद्भुत ठिकाण)

परवा एका सेमिनारसाठी गोव्याला गेलो होतो २ दिवस. दुपारी ३ वाजता पोहोचल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत काही विशेष काम नव्हतं. त्यामुळे २ सहकाऱ्यांना जवळची देवराई दाखवायला घेऊन गेलो. पणजी पासून साधारण ५० किमी अंतरावर नानोडे नावाचं एक गाव आहे. त्या गावाच्या परिसरात २ देवराया आहेत, त्यातील एक ही "निरंकाराची राई".
देवराई म्हणजे देवाच्या नावाने राखून ठेवलेलं जंगल. त्यातील झाडांची तोड़ केली जात नाही. तो भाग जपला जातो. अशा शेकडो देवराया भारतभर आढळतात. देवराया या वैशिष्ट्यपूर्ण संरक्षण, संवर्धन आणि जीवसृष्टीसाठी प्रसिद्ध आहेत.
नानोडे गावच्या देवराईमधे आढळणारी परिस्थिती जगात फारच कमी ठिकाणी बघायला मिळते. याला "Myristica swamps" असं म्हटलं जातं. इथे देव म्हणजे एक ओबडधोबड दगड आहे.
या देवराईचं वैशिष्ट्य म्हणजे इथे जंगली जायफळ आढळतं. ही झाडं एका विशिष्ट वातावरणात आढळतात. पाणी भरपूर असलेल्या आणि ते पकडून ठेवणाऱ्या जमिनीत ही झाडं उगवतात आणि वाढतात. पाणी खूप असल्याने मुळांना पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही. त्यामुळे जशी खाजणांत वाढणाऱ्या झाडांची मुळे पाण्याच्या पृष्ठभागाच्या वर येतात आणि झाडाला लागणारा ऑक्सिजन पुरावतात तशीच यंत्रणा या जायफळच्या झाडांमधेही बघायला मिळते. फक्त यात एक मोठा आणि विशिष्ट फरक हा असतो की या झाडांची मुळे वर येतात आणि त्या नंतर "U" आकारात परत जमिनीच्या खाली जातात.
या देवराईतून पाण्याचे अनेक झरे निघतात. गावातील लोक पिण्याच्या पाण्यासाठी इथेच येतात. हे पाणी वर्षानुवर्षे वाहत आहे. या पाण्यावर पुढे गावात वर्षाला किमान २ पिकं घेतली जातात.
केवळ 0.२ हेक्टर जमिनीवर असलेल्या या देवराई मुळे  पुढच्या अनेक गावांना पिण्यासाठी आणि शेतीसाठी पाणी उपलब्ध होतं.
अशा प्रकारची "Myristica swamps" भारतात फ़क्त ४-५ ठिकाणी नोंदली गेली आहेत आणि गोव्यात तर फक्त एकाच ठिकाणी आहे. दुर्दैवाने, ही एवढी दुर्मिळ गोष्ट फार कोणाला माहित नाही.
दुसऱ्या दिवशी सेमिनारला आलेल्या लोकांपैकी ९०% लोकांना ही गोष्ट माहित नव्हती. आणि यात वेगवेगळ्या सरकारी खात्यातील कनिष्ठ ते वरिष्ठ अधिकारी आणि काही मंत्री होते.
या आणि अशा देवरायांचा उपयोग करून घेऊन लोकसहभागातून उत्तम जलसंधारण करणं सहजशक्य आहे. या दृष्टीने आमचे प्रयत्न चालु असून त्याला चांगलं यश येतंय.
या वैशिष्ट्यपूर्ण देवराईबद्दल आणि जल व्यवस्थापनाच्या दृष्टीने देवराई संस्थेचा उपयोग कसा करता येऊ शकेल याबद्दल जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचून त्याचा योग्य वापर व्हावा म्हणून हा लेखप्रपंच.