Friday 29 April 2016

जलसंधारण करताना .....


जलसंधारण करताना दीर्घकालीन चांगला परिणाम होण्यासाठी आणखी काय करायला हवं?


आज आकाशवाणी अस्मिता वाहिनीकडून फोन आला होता. महाराष्ट्रात पडलेला दुष्काळ आणि त्यावर चाललेले उपाय यावर मत काय हा प्रश्न विचारला आणि अजुन काय करणं आवश्यक आहे याबद्दल माझं मत विचारलं. माझं उत्तर खाली देतोय -
नद्यांचं खोलीकरण करणं जोरात चालू आहे. नदीतला गाळ काढणं हे अतिशय योग्य आहे. ते करायलाच हवंय. पण नद्यांचं सरसकट 3 मीटर, 6 मीटर खोलीकरण करणं आणि तेही सलग 5-7 किमी करणं थोडंसं धोक्याचं आहे.नदी ही एक परिसंस्था (ecosystem) आहे. आपण जास्तीत जास्त पाणी अडवण्यासाठी तिथे मोठी टाकी किंवा डोह तयार करतोय का याचा विचार काम करणार्या माणसांनी करायला हवा. आपण फक्त माणसाची गरज बघून पाणी साठवण्याचा विचार करतोय, निसर्गाच्या संतुलनाचा करत नाहीये.आज पाणी साठवून ठेवताना नदीचा नैसर्गिक उतार संपतोय, प्रवाहावर त्याचा परिणाम होणार आहे. नदी वाहती राहिली नाही तर त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतील.त्याचबरोबर, आपल्याकडे बहुतेक सर्व गावांमधे सांडपाणी नदीत सोडलं जातं. आता ते सांडपाणी प्रवाहाबरोबर निघून जातं. तिथे खोलीकरण करून पाणी साठवलं तर सर्व साठा प्रदूषित होण्याची भीती आहे. यावर ठोस उपाय होत नाही तोपर्यंत हा धोका कायमच आहे. यामुळे सर्व साठवलेलं पाणी आणि भूगर्भातील पाणी प्रदूषित होईल.दुसरा आणि अत्यंत महत्त्वाचा भाग आहे ज्याकडे बहुसंख्य लोकांनी दुर्लक्ष केलंय, तो म्हणजे, जलसंधारणाचे दीर्घकालीन फायदे हवे असतील तर आजपर्यंत जी बेसुमार वृक्षतोड झालीय त्यावर उपाय म्हणून मोठ्या प्रमाणावर झाडं लावून ती जगवण्याचे सर्व प्रयत्न करावे लागतील. जर झाडं लावली आणि वाढवली गेली नाहीत तर पुन्हा 2-3 वर्षांत बंधारे गाळाने परत भरून जातील.झाडं लावणं आणि जगवणं ही खूप कठीण गोष्ट येत्या 2-3 वर्षांत परिणामकारकरित्या करावी लागणार आहे. त्यामुळे मातीची धूपही कमी होईल आणि मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढेल.हे दोन्ही उपाय एकाचवेळी करण्याची गरज आहे. जलसंधारणाची कामं site specific असणं आवश्यक आहे. त्यामुळे सरसकट सर्वत्र एकाच प्रकारचं काम न करता, लोकसंख्या, पाणी साठवण्याची क्षमता, नदीच्या पात्राची रूंदी, खोली, आजुबाजुच्या परिसरातील शेतजमिनी आणि वस्त्यांचं प्रमाण, इत्यादि बाबींचा अभ्यास करून मग कामं केली तर कोणाचंच नुकसान न होता सर्वांचा फायदा होऊ शकतो.शहरांतही प्रत्यक्ष काम खूप कमी लोक करून घेताना दिसतायत. लोकांचा भर पाण्याबद्दलची चर्चा एकमेकांत, माध्यमांत आणि सोशल मिडीयावरच जास्त दिसतेय. 

यावर्षी पाऊस कमी झाल्यामुळे आणि आपल्याकडे पाणी वापरण्याचं आणि वाचवण्याचं नियोजन नसल्यामुळे पाण्याची गंभीर टंचाई निर्माण झालीय. यात एक गोष्ट चांगली आहे की गेली 2-3 वर्षं जलसंधारणाचे विविध प्रयत्न वेगगवेगळ्या संस्थांकडून, विविध पातळ्यांवर होतायत.

यावर्षी चालू असलेले प्रयत्न 2 प्रकारे आहेत, tanker किंवा अन्य मार्गाने पाणीपुरवठा करणं आणि विविध नद्यांचं खोलीकरण करणं. 
बाकीही जलसंधारणाची कामं होतायत पण वर सांगितलेली कामं विशेष चालू आहेत. यातल्या पाणी पुरवठ्याच्या प्रयत्नांची गरज नक्कीच आहे. कारण लगेच पाणी देण्याचा दुसरा कोणताही परिणामकारक पर्यायी मार्ग नाहीये.

अजुन एक मुद्दा. नदी त्या भागातल्या सगळ्यात सखल भागातून वाहते. तिचं खोलीकरण करून अजुन 10-20 फूट खोल जाऊन आपण तो भाग अधिक सखल करतोय. त्यामुळे नदीतलं पाणी बाजुला जाईल की आजुबाजुला असलेल्या शेतांतलं पाणी उताराने खोल केलेल्या नदीत येईल? यावर कोणी विचार केलाय का? अशाने आजूबाजूच्या शेतातल्या विहिरी लवकर आटायची भीती निर्माण झाली आहे. 

खोलीकरण करताना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की नुसतं खोलीकरण करून काही फार उपयोग नाही होणार. जर ठराविक अंतरावर योग्य जागा बघून छोटे बंधारे (जास्तीत जास्त ३-४ फूट उंचीचे) बांधले तर पाणी काही काळ थांबेल आणि मग ते आजूबाजूला जमिनीत जिरेल. अर्थात, त्यासाठी जागा बाजुओं खोलीकरण करणं आवश्यक आहे. 

त्याचबरोबर, जे बंधारे बांधलेले आहेत पण पाणीगळती होतेय किंवा गाळाने भरलेले आहेत तिथेही योग्य पद्धतीने दुरूस्ती, बळकटीकरण आणि गाळ काढणं इत्यादि कामं केली पाहिजेत. शक्य तिथे योग्य जागी भूमिगत बंधारे बांधणे, झरे, ओढे, नद्या, तलाव, पाझर तलाव, इत्यादि प्रकारांनी जलसंधारण केलं पाहिजे.

यात लोकसहभाग खूप महत्त्वाचा आहे. लोकसहभागाशिवाय यात दीर्घकालीन यश कठीण आहे.

शहरातल्या लोकांनीही हे लक्षात ठेवायला हवं की सध्या आपल्याला मिळत असलेलं पाणी हे आजुबाजुच्या ग्रामीण परिसरातून मिळतेय आणि अशीच परिस्थिती कायम राहिली तर दिवसेंदिवस शहराला होणारा पाणी पुरवठा कमी होत जाणार आहे. त्यामुळे फक्त या पाण्यावर अवलंबून भागणार नाही. आपल्या परिसरात पडणारं पााणी आपण जमिनीत जिरवून नंतर वापरू शकतो. त्यामुळे महापालिकेवर पिण्याव्यतिरिक्त पाण्यासाठी जास्त अवलंबून रहावं लागणार नाही. फक्त त्यासाठी केवळ चर्चा करून चालणार नाही, योग्य तज्ज्ञ व्यक्तींकडून योग्य ठिकाणी योग्य प्रकारे काम करावं लागेल.
पाण्याच्या स्वयंपूर्णतेकडे जायचं असेल तर हे लवकरात लवकर करावंच लागेल. अन्यथा, येणारा काळ आणखी बिकट असणार आहे. 
फोटो - नदीचं खोलीकरण चालू असताना. 

Tuesday 26 April 2016

जमिनीखाली ४०० फुटांवर पाणी नाही पण २० फुटांवर आहे! हा चमत्कार आहे की नैसर्गिक गोष्ट?

जमिनीखाली ४०० फुटांवर पाणी नाही पण २० फुटांवर आहे! हा चमत्कार आहे की नैसर्गिक गोष्ट?

 ही कथा आहे माझ्या एक मित्राची, हेमंत पारसकरची. ३ वर्षांपूर्वीची. एक रोटरी कार्यक्रमात तो दुसर्या मित्राला सांगत होता, त्याचं बदलापुरजवळ फ़ार्म होतं आणि तिथे पाण्याचा काही प्रश्न होता. एक बोरवेल आहे पण पाणी फक्त १०-१५ मिनिटं येतं आणि मग बंद पडतं. आता दूसरी बोरवेल करायची आहे, त्यासाठी माणूस येणार आहे. तेवढ्यात त्याने मला पाहिलं आणि तो मला म्हणाला की एकदा येऊन सांग ना काही करता येतय का ते?
कामाच्या व्यापात ते राहून गेलं आणि एक दिवस त्याचा परत फोन आला की आज दूसरी बोरवेल करतोय कारण पहिली बोरवेल अजिबात पाणी देत नाहीये. मला वेळ होता म्हणून मी गेलो, तेव्हा बोरवेलचं काम चालु झालं होतं. त्यामुळे त्याबद्दल काही न बोलता मी त्याला सांगितलं की काही अडचण आली तर सांग, मी आत्ता तुझ्या जमिनीचा सर्वे केलाय आणि माझ्याकडे अजुन १-२ मार्ग आहेत पाणी मिळवण्यासाठी.
रात्री त्याचा फोन आला की थोडं थोडं करत ४०० फुटांपर्यन्त खाली गेल्यावरही पाणी बिलकुल मिळालं नाही. शेवटी बोरवेल करणारा वाद घालून निघून गेला. तेव्हा तू काहीही कर पण उद्या ये.
मी दुसर्या दिवशी गेलो. सगळे हताश होते की ४०० फुट खाली जाऊन पाणी नाही मिळालं, आता पुढे काय? लावलेली झाडं मरणार का? पाणीच नाही मिळालं तर पुढे काय करायचं?
मी केलेल्या त्या जमिनीच्या अभ्यासाप्रमाणे मी त्यांना सांगितलं की तुम्ही इथे बोरवेल न करता विहीर करायला हवी होती. विहीरीला पाणी मिळेल इथे.
त्या सर्वांना हा मोठा धक्का होता. जिथे ४०० फुट खोल पाणी मिळालं नाही तिथे हा सांगतोय की विहीरीला पाणी मिळेल? त्यावर खूप विचार करून त्यांनी माझ्या सल्ल्यावर विश्वास ठेवला आणि मी काढून दिलेल्या ठिकाणी विहीर खणायला सुरुवात केली.

दुसर्या दिवशी दुपारी त्या मित्राचा फोन आला, उमेश, १७ फुटांवर एक झरा मिळालाय आणि २ तासांनी परत फोन आला की १९ फुटांवर अजुन एक झरा लागलाय.
सकाळी मी जागेवर गेलो तेव्हा तिथे अंदाजे ४ फुट पाणी जमा झालं होतं. सगळ्यांच्या दृष्टीने हा चमत्कार होता कारण ४०० फूट खोल पाणी नाही आणि २० फुटांवर आहे हे दिसत असलं तरी पटत नव्हतं.
तेव्हापासून तय विहीरीला आजतागायत पाणी आहे. यावर्षी कमी पाऊस, जास्त तापमान या गोष्टी असूनही त्या विहीरीला आजही पाणी आहे आणि त्या पाण्यामुळे झाडं चांगली वाढली आहेत.
यावरून काय लक्षात ठेवायचं? 
१. जमिनीचा प्रकार, उतार, मातीच्या थराची जाडी, मातीचा प्रकार, भौगोलिक परिस्थिती आदि गोष्टींचा अभ्यास करून योग्य प्रकारे जलसंधारण उपाय केले तर निश्चीत फायदा होतो.
२. पाण्याचा स्त्रोत कसा आहे, कुठे आहे, त्याची ताकद किती आहे हे कोणाला नक्की सांगता येत नाही. त्याचा फ़क्त अंदाज बांधता येतो.
३. हे काम योग्य अधिकारी व्यक्तिकडून करून घेणं चांगलं, त्यामुळे यश मिळण्याचं प्रमाण खूप वाढतं.
४. विहीरीला पाणी मिळालं म्हणजे बोरवेल पण पाणी देईल हा समज चुकीचा आहे.

डॉ. उमेश मुंडल्ये       

Monday 18 April 2016

काशिग जलसंधारण योजना २०१६

काशिग जलसंधारण योजना २०१६ -
 काशिग हे गांव लोणावळा पौड़ रस्त्यावर तिकोना किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेलं आहे. एकदम सुंदर आणि निसर्गरम्य परिसर.  चारही बाजूंनी असलेल्या डोंगर रांगा मधे वसलेल्या ७ वाडया , ३ वाडया  सपाटीला तर बाकीच्या २०० ते ४०० फुट उंचीवर. गावाची लोकसंख्या ६००० च्या घरात . गावापासून ३ - ४ किलोमीटर वर एक धरण. सगळं गाव डोंगराच्या उतारावर वसलेलं. सगळा उतार धरणाकडे जाणारा. धरणाच्या पलीकडे एक विहीर. त्यातून गावाला पाणी पुरवठा होतो. पण त्यासाठी लागणारी वीज खूप आहे आणि त्याचा खर्च ग्राम पंचायतीला परवडत नाही. आणि त्यात पम्प बंद पडला किंवा वीज नसेल तर पाणी मिळत नाही. गावातून वाहणारा एक ओढा, त्याला पण फार खोली आणि रुंदी नाही. काही ठिकाणी तर उतार एवढा जास्त आहे की पाणी साठविण्यासाठी काही उपयोग नाही. सपाटीवर या ओढ्याशिवाय कुठेही पाणी अडवायला जागा नाही. माती फार खोल नसल्याने आणि शेती असल्याने तलाव होण्याची शक्यता नाही.   
पण हे असूनही गाव तसं सुदैवी म्हणायला हवं कारण वरच्या डोंगरातून ११ ठिकाणी झरे वाहतात आणि त्याचं पाणी गावाला जानेवारी पर्यन्त मिळतं. हे झरे उंचावर असल्याने पाणी गावापर्यन्त उताराने कोणतीही शक्ती  न वापरता येतं. पण हे पुरेसं होत नाही आणि गावाला  जानेवारी ते जून पाण्याची टंचाई जाणवते.
तसेच हे झरे प्रत्येक वाडीच्या वर साधारण ३०० ते ६०० फूट उंच असल्याने तिथे जाऊन पाणी भरणं कठीण आहे.
रोटरी क्लब ऑफ़ खड़की  यांनी आमच्या पूर्वीच्या एक कामाचे रिपोर्ट वाचून आम्हाला या गावासाठी काही करता येईल का हे पाहण्यासाठी बोलावलं.
आमच्या असं लक्षात आलं की ७ वाडया खूप अंतरावर आहेत आणि प्रत्येक वाड़ीसाठी स्वतंत्र पाणी पुरवठा योजना आवश्यक आहे. आणि या योजनेसाठी ऊर्जेची गरज लागता कामा नये.
गावासाठी पाणी  व्यवस्थापन करताना पिण्याचे पाणी, दुसर्या पिकासाठी पाणी आणि जनवरांसाठी पाणी असे प्रकार करून त्याप्रमाणे योजना करायचं ठरवलं.
प्रत्येक वाडीला किमान १ आणि कमाल ३ झरे पाणी पुरवू शकतात अशी परिस्थिती होती. या झर्यांच्या उगमाजवळ कुंड बांधून पाणी साठवल आणि पाइप टाकून ते त्या वाडीजवळ आणून दिलं (by gravity) तर त्याचा गावाला खूप फायदा होईल हे समजावून सांगितल्यावर गावकरी आणि रोटरी क्लब या दोघांनाही ते पटलं.  मग तसा रिपोर्ट करून दिला.
रोटरी क्लबला Tata Autocomp Hendrickson या कंपनीने हा प्रकल्प पटल्यावर काही आर्थिक मदत देऊ केली आणि कामाला सुरुवात झाली.
३ महिन्यांमधे ११ झर्यांची कुंड बांधणे आणि आवश्यक तिथे वाड़ी पर्यन्त पाईप टाकणे आणि ३ बंधारे (शेतीसाठी) बांधणे ही कामं पूर्ण केली. ही सगळी ठिकाणं ३०० ते ६०० फुट ऊंच आहेत आणि सर्व सामान माणसांनी डोक्यावर घेऊन अतिशय मेहनतीने त्या त्या ठिकाणी वर चढवलं कारण रस्ता नसल्याने सामान न्यायला दुसरा काही मार्ग नव्हता.
दर वर्षी जे झरे जानेवारीत कोरडे व्हायचे ते या वर्षी काम केल्यावर (ते ही जानेवारी मधे करूनही) एप्रिल मधेही पाणी देत आहेत. आणि त्यासाठी कोणत्याही प्रकारची ऊर्जा वापरावी लागत नाहीये.
या व्यतिरिक्त डोंगरावर असलेला तलाव गाळ काढून स्वच्छ केल्यामुळे या वर्षीच्या पावसाळ्यानंतर तो तलाव पूर्ण क्षमतेने भरेल आणि त्यातून वर्षभर पाणी पुरवठा होऊ शकेल. पूर्ण भरल्यावर त्याची क्षमता अंदाजे दीड कोटी लीटर पाणी साठवण्याची आहे.


तीनही बंधारे शेतीच्या भागात असल्याने मोठ्या संख्येने शेतकर्यांना दुसरं पीक घेता येणे शक्य होणार आहे.  तीनही बंधार्यांची साठवण क्षमता अंदाजे २० लाख लीटर आहे. आणि हे जवळजवळ मार्च पर्यन्त पाणी साठवून ठेवतील.
झरे रोज अंदाजे १५ -२० हजार लीटर पाणी पुरवू शकतात. ११ झरे मिळून रोज अंदाजे दोन लाख लीटर पाणी पुरवू शकतात.
सगळ्या प्रकल्पातून दर वर्षी साधारण ३० कोटी लीटरपेक्षा जास्त पाणी अडेल, जिरेल आणि वापरता येईल. 
एवढं सगळं पाणी हे कोणत्याही ऊर्जेशिवाय गावकर्यांना वापरायला मिळणार आहे ही यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे.
जर कोणतीही जल संधारण योजना त्या गावाच्या परिसराचा अभ्यास करून, पाण्याच्या उपलब्धतेचा आणि मागणीचा विचार करून, लोकसंख्या आणि क्रयशक्तीचा अभ्यास करून आखली आणि त्याप्रमाणे काम केले आणि त्यात लोक सहभाग घेतला तर निश्चित दीर्घकालीन फायदा होतो. 





    

Tuesday 12 April 2016

लोकसहभागामधून जलसंधारण - इखरीचा पाडा, मोखाडा

लोकसहभागामधून जलसंधारणइखरीचा पाडामोखाडा  
जलसंधारण जर यशस्वीपणे दीर्घकाळ राबवायचं असेल तर त्यात स्थानिक लोकांचा सहभाग आवश्यक असतो. गावाला लागणारं पाणी त्याच परिसरात अडवणे, जिरवणे आणि साठवणे यातून गावाच्या पाण्याच्या गरजेची पूर्तता होऊ शकते. यात पिण्याचंच नाही तर घरगुती वापराचं, गुरांसाठी, इतर वापरासाठी आणि दुसर्या तिसर्या पिकासाठी पाणी याचा विचार करून उपाययोजना आखणं गरजेच असतं.
मोखाडा तालुका हा 100% आदिवासी तालुका म्हणून ओळखला जातो. या आणि बाजूच्या शहापूर तालुक्यामधून शहरांसाठी पाणीपुरवठा होतो. पण स्थानिक लोकांना हे पाणी वापरायला बंदी आहे. तसंच लोकवस्ती विरळ आणि पाड्यांमधे विखुरलेली असल्याने जलसंधारण नीट झालेलं नाही, जे झालंय त्यातील बरचसं उन्हाळ्यात उपयोगी पडत नाही कारण सदोष आणि अपुरं बांधकाम केल्यामुळे पाणी मार्चमधेच संपून जातं.
इखरीचा पाडा हे या तालुक्यातलं शेवटचं गाव. बाजूला 5 पाडे. जवळचा बस थांबा 2 किमी लांब. गावात 1 विहीर आणि गाव आणि 5 पाडे (साधारण 2500 लोकवस्ती) पाण्यासाठी या एकमेव विहीरीवर अवलंबून. विहीर मार्चमधे आटायची. पुढचे 3 महिने टँकरवर अवलंबून, तोही आठवड्यातून 2-3 वेळा. विहीर 22 फूट व्यासाची. पाणी 60 फूट खोल, विहीरीच्या मध्यभागी. गावकर्यांनी विजेचे 2 पोल टाकले होते विहीरीवर आणि बिचार्या बाया आणि मुली, बरेचदा पुरूषही, त्या पोलवरून विहीरीवर चालत जाऊन पाणी काढायचे. हे दरवर्षी 3 महिने. लोकांचा सर्वांवरचा विश्वास उडाला होता. गावात पाणी कमी म्हणून स्थलांतराचं प्रमाण खूप. शिक्षण नसल्यामुळे फक्त मजुरीवर जगायला लागायचं. शेती फक्त पावसाळी, भाताची.


 
                            














     Well before work June 2009      
     

  Water fetching from well before work

आरोहन नावाच्या संस्थेने तिथे काम करायला सुरूवात केली होती. त्यांनी बोलावलं पाण्याचं काही करता येईल का याचा अभ्यास करायला.
गावातील विहीर ही बेसिनमधे होती. वरच्या आणि खालच्या बाजूला भात खाचरं आणि बाजूने वाहणारा पावसाळी ओहोळ. 
योजना अशी हवी होती की
1.किफायतशीर, 
2. देखभालखर्च अजिबात नको किंवा अगदी कमी,
3. योजनेसाठी वीज किंवा इतर उर्जेची गरज पडायला नको, 
4. कामामुळे कोणाचीही जमीन पाण्याखाली जायला नको
5. पिण्यासाठी, वापरासाठी आणि 2-3 पिकांसाठी पाणी उपलब्ध व्हायला हवं
6. विहीरीचं पाणी संपायला नको

तिथे आम्ही रोटरी क्लबच्या आर्थिक मदतीतून आणि आमच्या योजनेनुसार विहीरीच्या खालच्या बाजूला 1 भूमिगत बंधारा बांधला (खर्च रू. 110000/-), देखभालखर्च- काही नाही, कोणतीही उर्जा लागत नाही,
भूमिगत असल्यामुळे कोणाचीही जमीन घ्यावी लागली नाही.

कामाचा परिणाम - 
  1. त्या वर्षापासून आजतागायत त्या विहीरीचं पाणी आटलं नाही. पाचही पाडे त्या विहीरीवर पाणी भरायचे. गेल्या 2 वर्षांत त्यातल्या 3 पाड्यांमधेही कामं झाली आणि तिथला पाणी प्रश्न पूर्णपणे सुटला.
  2. गोष्ट इथेच नाही संपत. पाणी पुरेसं राहतंय म्हटल्यावर लोकांनी तलाव केला, त्यात पाणी साठवलं आणि मासे सोडून त्याचा व्यवसाय चालू केला
  3. गावातले रस्ते स्वकष्टाने कॉंक्रीटचे केले
  4. माती होती, पाणी मिळालं, विटा पाडल्या आणि घरं पक्की करून घेतली.
  5. काही लोकांनी भाजीपाला लागवड चालू केली.
  6. यामुळे स्थलांतर खूप कमी झालं, आरोग्य सुधारलं, लोकांमधे आत्मविश्वास आला.
  7. या भागातल्या काही शेतकर्यांनी एकत्र येऊन भाजीपाला लागवड केली. त्यातून भेंडी, मिरची निर्यात केली
  8. सध्या काही जण मोगरा लागवड करतायत.
हे सगळं कशामुळे झालं? तर लोकसहभागातून आवश्यक ते उपाय योजल्यामुळे. 
यावरून हे लक्षात येईल की योग्य ठिकाणी योग्य प्रकारे काम केलं तर यश नक्की मिळतं. लोकांना प्राथमिक सुविधा नीट मिळाल्या तर पुढचे बरेच प्रश्न मिटतात आणि परिसराचा शाश्वत विकास होतो.



Well in March after watershed development


Pond for fishing






             






                                                   


Friday 8 April 2016

बोरवेल पुनर्भरण - समज गैरसमज

बोरवेल पुनर्भरण - समज गैरसमज
मागच्या आठवड्यात मंडणगडला गेलो होतो. माझी सवय आहे की सकाळी आपण राहतो त्या परिसरात एक चक्कर मारायची तिथली झाडं, पाणी, पक्षी वगैरे पहायचं. तिथे ज्या हॉटेलमधे राहिलो होतो तिथे एक बोरवेल होती. त्या बोरवेलच्या सभोवताली एक चौकोनी खड्डा केला होता (5×5 फुटांचा, 10 फूट खोल) आणि त्यात खडी आणि रेती टाकून तो खड्डा जवळजवळ भरला होता. त्या खड्ड्यात घराच्या छपराचं पाणी सोडलं होतं.

मालकिणबाई बागेत काम करत होत्या. मी त्यांच्याशी गप्पा मारायला गेलो कारण मातीत हात घालून आनंदाने काम करणारी माणसं मला आवडतात. त्यांना मी या प्रकाराबद्दल विचारलं. त्या म्हणाल्या की बोरवेलचं पुनर्भरण केलंय. पावसाचं पाणी इथे खड्ड्यात सोडलंय ते जमिनीत मुरेल आणि आमच्या बोरवेलला त्याचा फायदा होईल.
मी चकित झालो. पाणी व्यवस्थापन क्षेत्रात काम करत असल्याने मला या योजनेचं विशेष आश्चर्य वाटलं. असा उपाय करून बोरवेलमधे पाणी जाणार का नक्की आणि  किती पाणी जाणार असे प्रश्न विचारल्यावर त्या गोंधळल्या. मग मी त्यांना माझ्या प्रश्नामागचं कारण सांगितलं.
असं का करू नये -
बोरवेल करताना जोपर्यंत माती, मुरूम असतो, तोपर्यंत केसिंग पाईप टाकतात, ज्यायोगे बोरवेल ढासळत नाही. खाली पक्का दगड (काळा कातळ) लागला की मग तो ड्रील करून त्याच्याखालचा पाण्याचा साठा शोधला जातो.
आता, जेव्हा पाऊस पडतो आणि पाणी नैसर्गिकपणे किंवा योजनेमार्फत जमिनीत मुरवलं जातं, तेव्हा ते मातीतून खाली जात जात शेवटी खालच्या कातळापर्यंत पोहोचतंं. पण त्याखाली जायला त्याला जागा नसते. कातळात क्वचित असणार्या हेअरलाईन फटींमधून त्यातलं 12 ते 15% पाणी खालच्या स्तरात जातं, तेही अनेक वर्षांमधे.
कातळाच्या वरच्या भागात जेव्हा पाणी मुरवलं जातं तेव्हा बोरवेलच्या केसिंग पाईपमुळे ते पाणी बोरवेलमधे जाऊ शकत नाही. तो खड्डा पावसात भरतो आणि ते पाणी वाहून जातं उताराच्या दिशेने. त्यामुळे बाजुला खड्डा करून पाणी मुरवणं हे फायद्याचं नक्की नाही. 
योग्य उपाय योजना -
विहीर असेल तर हे फायद्याचं ठरू शकतं कारण विहीरीचे झरे हे कातळाच्या वर असल्याने मुरवलेलं पाणी विहीरीतून परत काढता येऊ शकतं.
बोरवेल पुनर्भरण करताना मात्र पाणी एका चेंबरमधे घेऊन ते फिल्टर करून मग थेट बोरवेलच्या केसिंग पाईपला जोडलं तरच तुम्ही सोडलेलं सर्व पाणी तुमच्या बोरवेलच्या साठ्यात जातं. यात आपण जवळजवळ 90% पर्यंत पडणारं पाणी बोरवेलच्या साठ्यात सोडू शकतो.


फायदे -

1. बोरवेल कोरडी होत नाही
2. पाण्यातले क्षार कमी होतात
3. बोरवेलचं आयुष्य वाढतं
4. परिसरात पाणी तुंबत नाही

फक्त ही योजना अमलात आणताना प्रत्यक्ष त्या कामाचा अनुभव असलेल्या तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला घ्यावा अन्यथा नुकसान होऊ शकतं.

Wednesday 6 April 2016

जलसंधारण आणि स्थानिक लोकांचा सहभाग

जलसंधारण आणि स्थानिक लोकांचा सहभाग - 

जलसंधारण जर यशस्वीपणे दीर्घकाळ राबवायचं असेल तर त्यात स्थानिक लोकांचा सहभाग आवश्यक असतो. गावाला लागणारं पाणी त्याच परिसरात अडवणे, जिरवणे आणि साठवणे यातून गावाच्या पाण्याच्या गरजेची पूर्तता होऊ शकते. यात पिण्याचंच नाही तर घरगुती वापराचं, गुरांसाठी, इतर वापरासाठी आणि दुसर्या व तिसर्या पिकासाठी पाणी याचा विचार करून उपाययोजना आखणं गरजेच असतं.
शहापूर तालुका हा आदिवासी तालुका म्हणून ओळखला जातो. या शहापूर तालुक्यामधून मुंबई, ठाणे इत्यादि शहरांसाठी पाणीपुरवठा होतो. पण स्थानिक लोकांना हे पाणी वापरायला बंदी आहे. तसंच लोकवस्ती विरळ आणि पाड्यांमधे विखुरलेली असल्याने जलसंधारण नीट झालेलं नाही, जे झालंय त्यातील बरचसं उन्हाळ्यात उपयोगी पडत नाही कारण सदोष आणि अपुरं बांधकाम केल्यामुळे पाणी मार्चमधेच संपून जातं.
हेमंत गोखले नावाचा मित्र विवेकानंद सेवा मंडळ या संस्थेसाठी काम करतो. तो म्हणाला तू पाण्याचं काम करतोस तर इथे ये ना. खूप लोकांनी प्रयत्न केलेत पण प्रश्न सुटला नाहीये. काही करता आलं तर गावाचं भलं होईल. म्हणून या गावाची भेट झाली.
विहीगाव हे या तालुक्यातलं एक गाव. रस्त्याच्या दोन्ही बाजूला मिळून एकूण 11 पाडे. या गावाचं वैशिष्ट्य म्हणजे अशोका चित्रपटातला "अशोका धबधबा" या गावात आहे. मध्य वैतरणा धरणाचा पाणीसाठा फक्त 2 किमीवर आहे, फक्त दरीत आहे त्यामुळे वर आणणं कठीण. इतका मोठा पाण्याचा स्त्रोत आहे तरी गावाला वर्षभर पाणी नाही पुरत कारण सगळं पाणी वाहून जातं. ओढ्यावर काही बंधारे आहेत पण ते गाळाने पूर्ण भरलेत आणि पाणी बंधार्यातून गाळून पुढे जातं, थांबत नाही. गावकरी मंडळी पाण्याचं काम करण्याबाबत एकदम उदासीन होती. बहुधा, पाणी आणायचं काम बायका करतात म्हणून असेल. गावात अनेक विहीरी पण उन्हाळ्यात गाव पाण्यासाठी एकमेव विहीरीवर अवलंबून. विहीर एप्रिलमधे आटायची. पुढचे 2 महिने विहीरीत उतरून पाणी भरायचं, तेही नंबर लावून. विहीरीवर आणि बिचार्या बाया आणि मुली, बरेचदा पुरूषही, विहीरीत उतरून पाणी काढायचे. हे दरवर्षी 2 महिने. लोकांचा सर्वांवरचा विश्वास उडाला होता. गावात पाणी कमी म्हणून स्थलांतराचं प्रमाण खूप. शिक्षण नसल्यामुळे फक्त मजुरीवर जगायला लागायचं. शेती फक्त पावसाळी, भाताची.
विवेकानंद सेवा मंडळ तिथे शिक्षण आणि व्यवसाय मार्गदर्शन विषयात काम करत होती. त्यांनी बोलावलं पाण्याचं काही करता येईल का याचा अभ्यास करायला.
गावातील विहीरी एकाच बेसिनमधे आहेत. वरच्या आणि खालच्या बाजूला भात खाचरं आणि मधून वाहणारा पावसाळी ओढा जो धबधब्यामधे संपतो.
सुरूवातीला लोक मिटींगला आलेच नाहीत 2 वेळा. मग आम्ही प्रत्येक घरी एक माणूस बोलवायला जाईल याची दक्षता घेतली आणि महिला बचत गटांना या कामात सहभागी करून घेतलं. बायकांना पाणी भरायली लागत असल्याने या प्रश्नाचं गांभीर्य कळत होतंच. मग एका मिटींगला फक्त बायकाच आल्या आणि त्यानंतर गावातली पुरूष मंडळीही हळूहळू सहभागी व्हायला लागली. मग गावाचं सर्वेक्षण करून कुठे काय करता येईल त्याचा आराखडा तयार केला. विवेकानंद सेवा मंडळ त्यांच्या निधीतून काम करणार होतं म्हणून आणि वेळ कमी होता म्हणून काही टप्प्यांत काम करायचं ठरलं.
एक विहीर कोसळली होती ती पुन्हा बांधून काढायची आणि दुसरी विहीर दुरूस्त करायची हा पहिला टप्पा.
पण गावकर्यांनी दाखवलेला उत्साह आणि खूप कमी पैशात काम करायची दाखवलेली तयारी यामुळे संस्थेचा हुरूपही वाढला. त्यातच, भारत विकास परिषदेनेही आर्थिक सहाय्य द्यायचं ठरवलं आणि मग उरलेल्या दिवसांत एक बंधारा बांधायचं ठरलं. आणि जूनच्या 15 तारखेपर्यंत ही सर्व कामं पूर्ण झाली.
ही योजना ठरवताना काही मुद्दे लक्षात घेतले होते,
योजना अशी हवी होती की
1. किफायतशीर,
2. देखभालखर्च अजिबात नको किंवा अगदी कमी,
3. योजनेसाठी वीज किंवा इतर उर्जेची गरज पडायला नको,
4. कामामुळे कोणाचीही जमीन पाण्याखाली जायला नको
5. पिण्यासाठी, वापरासाठी आणि 2-3 पिकांसाठी पाणी उपलब्ध व्हायला हवं
6. विहीरीचं पाणी संपायला नको
यात काम करताना एक अडचण आली. बंधार्याच्या जागेच्या बाजूला एकाचं शेत होतं. त्याने ना हरकत पत्र दिलं होतं. पण काही असंतुष्ट गावकर्यांनी त्याला घाबरवलं की तुझं शेत बुडणार. मग त्याने काम बंद करायला सांगितलं. मग मी जाऊन त्याला समजावून सांगितलं आणि काम परत चालू झालं. असं तीन वेळा झालं.
पण शेवटी सगळ्यांच्या प्रयत्नांनी हे काम पूर्ण झालं. या बंधार्यामुळे 5 फूट पाणी 30 फूट रूंद आणि 200 मीटर लांबपर्यंत साठणार आहे.
विहीरी नवीन बांधल्यामुळे आणि बंधार्यामुळे यावर्षी गावाला पिण्याच्या आणि वापराच्या पाण्याचा प्रश्न पडणार नाही. पुढचा टप्पा झाला की शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटेल. तेव्हा खर्या अर्थाने पाणी व्यवस्थापन पूर्ण झालं असं म्हणता येईल.
या सर्व कामात विवेकानंद सेवा मंडळाने पुढाकार घेतला. गावकरी मंडळीनी सहभाग दिला आणि भारत विकास परिषदेने आर्थिक सहाय्य दिलं.
या कामात गावातल्या लोकांनी मेहनत घेतल्यामुळे आता ते हे काम जपतायत. "हे माझं काम आहे" ही भावना त्यांच्या मनात रूजवण्यात आम्हाला आलेलं यश ही सगळ्यात मोठी जमेची बाजू आहे.
गावाच्या परिस्थिती नुसार, मागणीनुसार आणि जे शक्य आहे तेच केलं तर पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडवता येणं शक्य आहे.





Tuesday 5 April 2016

Watershed development structure - For enhancing life of wells & water table upstream the bund

जलसंधारण-
जलसंधारण म्हणजे एखाद्या परिसरात पडणार्या पावसाचे पाणी किंवा वाहून आलेले आणि जाणारे पाणी शास्त्रीय पद्धतीने विविध उपायांचा वापर करून अडवणे, साठवणे आणि जिरवणे. याचा उपयोग जमिनीतील पाण्याची पातळी वाढणे, त्यामुळे परिसरातील पाण्याच्या स्त्रोतांची ताकद आणि आयुष्य वाढणे यासाठी होतो.
अशा प्रकारच्या कामांमधून पिण्याचं पाणी, वापराचं पाणी, जनावरांसाठी पाणी, शेतीसाठी पाणी, इत्यादि कारणांसाठी पुरेसं पाणी गावाच्या परिसरात उपलब्ध होऊ शकतं.
यातील अत्यंत परिणामकारक ठरणारा पण अत्यंत दुर्लक्षित किंवा माहितही नसणारा उपाय म्हणजे "भूमिगत बंधारा".
भूमिगत बंधारा (subsurface bund) -
भूमिगत बंधारा साधारणपणे ओढे, नदी यांमधे तसेच उतारावरच्या जमिनीत वेगवेगळ्या terraces वर विहीरीच्या खालच्या पातळीवर जमिनीखाली बांधला जातो. यामधे योग्य ठिकाण निश्चित करून मग एक चर खोदला जातो. खाली चांगला, अखंड दगड लागला की मग त्या भागात mass concrete चा बंधारा बांधला जातो आणि चर परत बुजवला जातो.
वर पाहणार्याला हा बंधारा बरेचदा कळतही नाही.
फायदे -
1. यात कोणाचीही जागा वाया जात नाही.
2. जमिनीखाली पाणी साठत असल्याने शेतीची जागाही वाया जात नाही, तिथे शेती करता येते.
3. पावसाळ्यानंतर पाणी जमिनीखालून वाहत राहते, ते यामुळे थांबवता येते.
4. जमिनीखाली असल्याने खर्च खूप कमी होतो. आणि देखभाल खर्च बिलकूल नाही.
5. पाणी जमिनीखाली अडल्यामुळे बाष्पीभवन कमी होतं, पाणी जास्त काळ टिकतं.
6. वरच्या शेतात काही प्रमाणात ओल राहते, त्यावर दुसरं पीक घेता येतं.
7. आजुबाजूच्या सर्व विहीरींचं पाणी जास्त काळ टिकतं.
भूमिगत बंधारा हा जलसंधारणातला अल्पमोली, बहुगुणी उपाय आहे.
टीप - हे काम योग्य सल्लागाराच्या सहाय्याने करावे म्हणजे उपाय होईल अन्यथा, चुकीच्या पद्धतीने केल्यास अपाय होऊ शकतो.