Monday 8 January 2018

वाघ्या - देवराई किती काळ आहे याचा दुवा!


लोक सहभागातून जीव विविधतेच संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी भारताला परंपरेने एक सुदृढ आणि पुरातन वारसा दिला आहे. एखादी गोष्ट जर दीर्घकाळ यशस्वीपणे चालू ठेवायची असेल तर ती लोकांच्या जगण्याचा एक भाग झाली पाहिजे या गोष्टीची जाण आपल्या शहाण्या पूर्वजांना असावी. त्यांनी निसर्गातील अनेक घटक देव किंवा देवाचे प्रिय घटक मानून त्यांचं संरक्षण करण्याची प्रथा वेगवेगळ्या कारणांनी चालू केली. यात नद्या, तलाव, विविध डोंगर शिखरं, विविध वनस्पती आणि प्राणी, इत्यादि गोष्टींना धार्मिक महत्त्व देऊन त्यांचं संरक्षण आणि संवर्धन पिढ्यानपिढ्या केलं. यातला एक आणि सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे "देवराई". 
देवराई म्हणजे देवाच्या नावाने राखून ठेवलेलं जंगल. हे जंगल देवाला अर्पण केलेलं असल्याने याची तोडकेली जात नाही. या जंगलातील सर्व गोष्टी धार्मिक भावनेने पिढ्यानपिढ्या सांभाळल्या जातात. हे देवाचे जंगल आहे त्यामुळे यातील कोणत्याही गोष्टीचा वापर व्यापारासाठी करायचा नाही, कोणतंही झाड तोडायचं नाही या ठाम भावनेने या देवरायांच संरक्षण केलं जातं. देवराईला कुंपण किंवा संरक्षक भिंत नसते, कोणी राखणदार नसतात, पण तरीही केवळ धार्मिक भावनेने या जंगलांच रक्षण केलं जातं. सामाजिक बंधन हा सर्वात जास्त परिणामकारक ठरणारा घटक आहे.
पण ही देवराई तिथे किती काळापासून असावी याबद्दल कोणी नक्की काही सांगू शकत नाही. तिथल्या वृक्षांच्या वयावरून याबद्दल केवळ एक अंदाज बांधता येतो.
पण, यात एक आशादायक चित्र सह्याद्रीमध्ये फिरताना हरिश्चंद्र गडाच्या परिसरात समोर आलं. या आहेत वाघ्याच्या देवराया! एका दगडावर वाघाचं चित्र कोरलेलं आहे आणि त्याची पूजा होते आहे अशी स्थानं. आदिवासींमध्ये अशी पद्धत आहे, की प्रत्येक पिढीचा एक वाघ्याचा दगड बसवला जातो. नवीन पिढी, नवीन दगड. साधारणपणे, ३० वर्षांच्या अंतराने नवीन दगड बसवला जातो. म्हणजे, एका पिढीचं अंतर ३० वर्षं धरलं जातं.
आता, यावरून आपण तो वाघ्याचा दगड ज्या देवराईमध्ये आहे त्या देवराईचा किमान कालावधी तरी नक्की सांगू शकतो. या भटकंतीमध्ये मी एका ठिकाणी वाघ्याचे १७ दगड बसवलेले पहिले.
याचा अर्थ, ती देवराई त्या आदिवासी समाजाकडून गेली ५०० वर्षं तरी जपली जाते आहे असं गणित आपण मांडू शकतो. (३० वर्षं x १७ दगड)
याचाच अर्थ असा होतो की, आदिवासी भागांमध्ये निसर्गातील प्राणी, पक्षी, झाडं, इत्यादि गोष्टींना देव मानून जपायची परंपरा या भागात किमान ५०० वर्ष तरी आहे याची ही नोंद आहे.
अशा गोष्टी बघायला आणि अभ्यासायला मिळाल्या की आपल्या पूर्वजांच्या शहाणपणावर असलेला विश्वास आणखी वृद्धिंगत होतो. 

Friday 5 January 2018



कोकणात मातीचे बंधारे - इच्छा आणि वास्तव


जलसंधारण करताना पाण्याच्या स्त्रोतामध्ये बंधारे घालून पाणी अडवणं आणि स्त्रोताचं खोलीकरण करणं (गाळ काढणं) हे सर्वात लोकप्रिय उपाय आहेत.
सरसकट मातीचे बंधारे बांधावेत का? की यात काही नुकसानही होऊ शकतं? कोकणात मातीचे बंधारे किती उपयोगी? त्याचे तोटे काय? त्यात धोका काय? असे अनेक प्रश्न मनांत येतात. या लेखात त्याबद्दल संक्षिप्त माहिती द्यायचा प्रयत्न केला आहे.
मातीचे बंधारे, माती किंवा रेती प्लास्टीकच्या पोत्यांमधे भरून बांधलेले बंधारे, हा उपाय कमी खर्चात होतो, त्याला विशेष कौशल्य लागत नाही, स्थानिक पातळीवर लागणारा माल आणि मनुष्यबळ उपलब्ध असतं, इत्यादि कारणांमुळे मोठ्या प्रमाणावर सरसकट केला जातो. 
जिथे माती काळी आहे, मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता चांगली आहे, जिथे पाण्याचा प्रवाह वेगवान नाहीये आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जिथे खेकडे नाहीत, अशा ठिकाणी मातीचे बंधारे किंवा माती/रेती भरून प्लास्टीकच्या पोत्यांचे बंधारे यशस्वी ठरतात.
जिथे मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी आहे, माती पाण्याबरोबर सहज वाहून जाते, पाण्याचा प्रवाह वेगवान आहे, उतार भरपूर आहे आणि खेकडे आहेत, अशा ठिकाणी मातीचे बंधारे किंवा माती/रेती भरून प्लास्टीकच्या पोत्यांचे बंधारे नुकसानकारक असतात.
नक्की काय होतं? -
१ जिथे पाण्याचा प्रवाह वेगवान असतो, तिथे या बंघाऱ्यावर साठलेल्या पाण्याचा दबाव येतो आणि मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी असल्याने, माती हळूहळू पाण्याबरोबर वाहून जायला सुरूवात होते आणि काही काळानंतर बंधारा निरूपयोगी होतो.
२ कोकणात बहुतेक सर्व ठिकाणी पाण्याच्या स्त्रोतामधे आणि आजुबाजुला खेकडे मोठ्या प्रमाणावर आढळतात. आपण जेव्हा बंधारा बांधतो आणि पाणी साठवतो, तेव्हा खेकडे तिथे सुरक्षित वातावरणामुळे येतात. ते मातीत बिळं करून राहतात. त्यामुळे पाण्याला जायला विविध ठिकाणी मार्ग उपलब्ध होतो. काही वेळा बंधाऱ्यातच बिळं होतात आणि पाणी वाहून जातं आणि सगळी मेहनत आणि पाणी वाया जातं.
३ जिथे प्लास्टीकच्या पोत्यांचा बंधारा बांधला जातो, तिथे अगदी चुकून जरी खेकड्याची नांगी लागून, वाहून येणाऱ्या काटक्या, फांद्या लागून पोतं फुटतं आणि आतली माती/रेती पाण्याबरोबर वाहून जाते.
४ मातीचा/पोत्यांचा बंधारा एका ठराविक उंचीचाच बांधावा लागतो. त्यामुळे पाण्याचा साठा मर्यादित करावा लागतो. आणि बाष्पीभवन होऊन बरचसं पाणी उडून जातं आणि जेव्हा गरज असते, तेव्हा उन्हाळ्यात हा बंधारा कोरडा पडतो.
कोकणात ह्या अडचणी विशेष जाणवतात. पण वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या पाहून इतर ठिकाणी चाललेले उपाय सरसकट कोकणात केले जातात. यासाठी कोणी तज्ज्ञ व्यक्तीला विचारून त्याचं मत गांभीर्याने घ्यावं असं फार कमी लोकांना वाटतं.
या सर्व कारणांमुळे होणारं सर्वात महत्त्वाचं आणि मोठं नुकसान फारसं कोणीच विचारात घेताना दिसत नाही. या बंधाऱ्यांसाठी लागणारी माती ही त्याच परिसरातून घेतली जाते. ती माती दरवर्षी पावसात वाहून जाते. त्यामुळे पुढचा बंधारे गाळाने भरतातंच, पण दरवर्षी आपण त्या परिसरातील माती कायमस्वरूपी गमावून बसतो. माती गमावली की त्याचा दुष्परिणाम शेती आणि जंगलांवर होतो आणि त्या परिसराची वाटचाल वाळवंट होण्याकडे होते.
एकीकडे जंगलतोड जोरात होते आहे, शेती कमी होत आहे त्यामुळे मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी होत चालली आहे, आणि दुसरीकडे, आहे ती माती अशा केवळ प्रासंगिक सोयीच्या गैरसमजुतीमुळे आपण कायमस्वरूपी गमावत आहोत. अशी शेकडो ट्रॅक्टर माती दरवर्षी असे बंधारे बांधत असलेल्या प्रत्येक गावात दरवर्षी वाहून जाते आणि आपण ती कायमस्वरूपी गमावतो आहोत. 
या सर्व बाबींचा योग्य अभ्यास केला तर लक्षात येईल की मातीचे बंधारे (विशेषत: कोकणात) हा उपाय पाणी साठवण्यासाठी सोपा म्हणून होत असला, तरी त्यामुळे होणारं नुकसान हे खूपच भयंकर आणि कायमस्वरूपी आहे. ही माती परत आणता येत नाही आणि माती परत तयार होणं ही अनेक दशकं लागणारी गोष्ट आहे.
या सर्व कारणांमुळे, जे जलसंधारण, व्यवस्थापन आदि कामं करू इच्छितात, त्या सर्वांना नम्र आणि कळकळीचं आवाहन आहे की स्थलानुरूप काम करा, वर सांगितल्याप्रमाणे परिस्थिती असेल तर तिथे मातीचे बंधारे बांधून पाणी, माती, शेती आणि जंगल धोक्यात आणू नका. ते पर्यावरण आणि जीवसृष्टीच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक आहे.