Monday, 8 January 2018

वाघ्या - देवराई किती काळ आहे याचा दुवा!


लोक सहभागातून जीव विविधतेच संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी भारताला परंपरेने एक सुदृढ आणि पुरातन वारसा दिला आहे. एखादी गोष्ट जर दीर्घकाळ यशस्वीपणे चालू ठेवायची असेल तर ती लोकांच्या जगण्याचा एक भाग झाली पाहिजे या गोष्टीची जाण आपल्या शहाण्या पूर्वजांना असावी. त्यांनी निसर्गातील अनेक घटक देव किंवा देवाचे प्रिय घटक मानून त्यांचं संरक्षण करण्याची प्रथा वेगवेगळ्या कारणांनी चालू केली. यात नद्या, तलाव, विविध डोंगर शिखरं, विविध वनस्पती आणि प्राणी, इत्यादि गोष्टींना धार्मिक महत्त्व देऊन त्यांचं संरक्षण आणि संवर्धन पिढ्यानपिढ्या केलं. यातला एक आणि सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे "देवराई". 
देवराई म्हणजे देवाच्या नावाने राखून ठेवलेलं जंगल. हे जंगल देवाला अर्पण केलेलं असल्याने याची तोडकेली जात नाही. या जंगलातील सर्व गोष्टी धार्मिक भावनेने पिढ्यानपिढ्या सांभाळल्या जातात. हे देवाचे जंगल आहे त्यामुळे यातील कोणत्याही गोष्टीचा वापर व्यापारासाठी करायचा नाही, कोणतंही झाड तोडायचं नाही या ठाम भावनेने या देवरायांच संरक्षण केलं जातं. देवराईला कुंपण किंवा संरक्षक भिंत नसते, कोणी राखणदार नसतात, पण तरीही केवळ धार्मिक भावनेने या जंगलांच रक्षण केलं जातं. सामाजिक बंधन हा सर्वात जास्त परिणामकारक ठरणारा घटक आहे.
पण ही देवराई तिथे किती काळापासून असावी याबद्दल कोणी नक्की काही सांगू शकत नाही. तिथल्या वृक्षांच्या वयावरून याबद्दल केवळ एक अंदाज बांधता येतो.
पण, यात एक आशादायक चित्र सह्याद्रीमध्ये फिरताना हरिश्चंद्र गडाच्या परिसरात समोर आलं. या आहेत वाघ्याच्या देवराया! एका दगडावर वाघाचं चित्र कोरलेलं आहे आणि त्याची पूजा होते आहे अशी स्थानं. आदिवासींमध्ये अशी पद्धत आहे, की प्रत्येक पिढीचा एक वाघ्याचा दगड बसवला जातो. नवीन पिढी, नवीन दगड. साधारणपणे, ३० वर्षांच्या अंतराने नवीन दगड बसवला जातो. म्हणजे, एका पिढीचं अंतर ३० वर्षं धरलं जातं.
आता, यावरून आपण तो वाघ्याचा दगड ज्या देवराईमध्ये आहे त्या देवराईचा किमान कालावधी तरी नक्की सांगू शकतो. या भटकंतीमध्ये मी एका ठिकाणी वाघ्याचे १७ दगड बसवलेले पहिले.
याचा अर्थ, ती देवराई त्या आदिवासी समाजाकडून गेली ५०० वर्षं तरी जपली जाते आहे असं गणित आपण मांडू शकतो. (३० वर्षं x १७ दगड)
याचाच अर्थ असा होतो की, आदिवासी भागांमध्ये निसर्गातील प्राणी, पक्षी, झाडं, इत्यादि गोष्टींना देव मानून जपायची परंपरा या भागात किमान ५०० वर्ष तरी आहे याची ही नोंद आहे.
अशा गोष्टी बघायला आणि अभ्यासायला मिळाल्या की आपल्या पूर्वजांच्या शहाणपणावर असलेला विश्वास आणखी वृद्धिंगत होतो. 

No comments:

Post a Comment