आज गोष्ट सांगतोय ओरिसामधील सातभायाची, एका सात
गावांच्या समूहाची, आणि एकूणच समुद्रकिनाऱ्यावर होत असलेल्या समुद्राच्या
आक्रमणाची. एकूणच, ओरिसामधील समुद्रकिनाऱ्याच्या ३०% पेक्षा जास्त किनाऱ्यावर समद्राच्या आक्रमणाचा दबाव आहे. समुद्राच्या पाणी पातळीमधे होत असलेली वाढ यासाठी कारणीभूत आहे. २०१४ मधे केलेल्या संशोधनातून अशी माहिती मिळते की ओरिसामधील १०% समुद्रकिनाऱ्याची जमीन या आक्रमणांमुळे धोक्यात आली आहे.
पारादीप बंदर आणि इतर अनेक बांधकाम प्रकल्पांमुळे त्या
परिसरातील सातभाया आणि इतर काही गावं समुद्राच्या आक्रमणांमुळे पाण्याखाली चालली
आहेत. एका संशोधनाच्या निष्कर्षानुसार, १९९९-२०१६ या काळात ओरिसाच्या ४८५ किमी
समुद्रकिनाऱ्यापैकी अंदाजे १५४ किमी म्हणजे साधारण २८% किनारा समुद्राच्या सततच्या
आक्रमणांमुळे गमावला आहे. यात, समुद्राची उंची वाढण्याबरोबरच सतत येत असलेली वादळं, बदलणारी
वाऱ्यांची दिशा ही कारणंही महत्त्वाची आहेत.केंद्र शासन या प्रश्नावर उपाय करण्यासाठी प्रयत्न करत आहे. २०१६ मधे संसदेत माहिती देताना सरकारने सांगितलंय की, या शतकाच्या अखेरपर्यंत जागतिक हवामान बदलांमुळे भारतातील समुद्राची उंची ३.५ इंच पासून सुमारे ३४ इंचांपर्यंत वाढेल (जवळपास ३ फूट) असं अनुमान आहे.
हे समुद्राचं पाणी आत येतं तेव्हा फक्त जमीन गिळंकृत करतं असं नाही, तर भूजलसाठा क्षारयुक्त होतो, शेतजमीन खराब होते, त्यामुळे शेती करणं अशक्य होतं, झाडं वाढत नाहीत, आहेत ती मरतात. पिण्यायोग्य पुरेसं पाणी नसल्याने, क्षारयुक्त पाणी वापरल्याने आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात. स्थलांतर करण्याची वेळ येते. अनेक सामाजिक प्रश्न निर्माण होतात.
ज्या सातभाया गावाबद्दल आपण बोलतोय, त्याची परिस्थिती फारच वाईट आहे. सातपैकी सहा गावं समुद्राने गिळंकृत केली आहेत. परिस्थिती इतकी वाईट आहे की सरकारने पुनर्वसन करताना १२ किमी लांब जागा निवडली आहे. या भागात होणारं समुद्राचं आक्रमण थोपवण्यासाठी समुद्रकिनाऱ्यावर एक वैशिष्ट्यपूर्ण भिंत बांधण्याचा प्रयोगही झाला आहे. हा प्रयोग पेंथा नावाच्या गावात झाला. १ किमी लांबीची भिंत यात बांधली गेली. २०१६ मधे हे काम पूर्ण झाल्यानंतर आक्रमण एकदम कमी झालं असं लोकांचं निरीक्षण आहे. पण या १ किमी लांब भिंतीला अंदाजे ४५ कोटी रूपयांच्या आसपास खर्च आला. आणि अशी भिंत केवळ वस्ती वाचवू शकते, पर्यावरणाच्या इतर घटकांना उपयोग होत नाही, तिथली जीवसृष्टी वाचवणं शक्य होत नाही. त्यामुळे आणि एकूण खर्चाचा विचार केला तर हे व्यावहारिक दृष्ट्या यशस्वी होणं जवळपास अशक्य आहे.
या सर्व गोष्टी मुंबई आणि कोकण भागातील लोकांनीही लक्षात घेणं
आवश्यक आहे. समुद्राचं आक्रमण या किनाऱ्यावरही हळूहळू होताना दिसतंय. त्यातच आपण
किनारपट्टीकडे पर्यावरण संतुलनाच्या गोष्टीने हवं तेवढं लक्ष देत नाही आहोत.
समुद्रकिनाऱ्यांचं रक्षण करायला उपयोगी पडणारी मॅन्ग्रोव्ह जंगलं धोक्यात आली
आहेत. वाढत्या लोकसंख्येच्या वाढत्या दडपणामुळे आपण या महत्त्वाच्या आणि उपयुक्त
गोष्टी हळूहळू गमावत चाललो आहोत.




