स्वागत २०१७
जिथे कोणत्याही मोबाइल फोनची रेंज येत नाही अशा सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या ३ गावांत २००० च्या आसपास लोक दिवसभर श्रमदान करण्यासाठी हजर होते. वासिष्ठी आणि जगबुडी या दोन नदया आणि त्यांच्या उपनद्या यांवर लोकसहभागातून आणि योग्य सल्ल्याने काम करून या नदया परत बारमाही करण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. या सर्व मोहिमेचा एक भाग होण्याची संधी मला मिळाली आणि मी या योजनेशी जोडला गेलो.
त्या दिवशी या कामाची सुरुवात जलपुरुष म्हणून ओळखले जाणारे स्टॉकहोम पुरस्काराने सन्मानित (पाण्याच्या क्षेत्रातील नोबेल प्राइज) श्री राजेंद्रसिंगजी, कोकणातील ४ जिल्ह्यांचे आयुक्त श्री प्रभाकर देशमुख, रत्नागिरीचे जिल्हाधिकारी श्री प्रवीण प्रभाकर, सीओ श्री लक्ष्मीनारायण मिश्रा, कोकण ग्रीन चे मनोहर सकपाळ, या सर्व लोकांना, सर्व गावकऱ्यांना, मुंबईतून आलेल्या १५० हून अधिक लोकांना, मी आणि माझे मित्र श्री संदीप अध्यापक यांना, अशा सर्वांना एकत्र आणणारे आणि स्वतः पुढे राहून काम करणारे श्री संजय यादवराव, या सर्वांच्या उपस्थितीत झाली.
सकाळी चालू झालेला हा कार्यक्रम रात्री ९ वाजेपर्यंत चालला. साधारण २ हजार लोक यात सहभागी झाले होते.
मुंबई आणि रत्नागिरीतून आलेले ओमकार गिरकर, शिवलकर आणि मित्रमंडळी यांच्यासारखे तरुण कार्यकर्ते त्यांचं कौशल्य कसं वापरता येईल याचाही प्रत्यक्ष अनुभव घेऊन बघत होते.
या दोन्ही नदया, त्यांच्या उपनद्या यांवर site specific लहान लहान कामं करून हे नैसर्गिक स्त्रोत बारमाही कसे करता येतील यावर काम सुरु झालंय.
यात अनेक इकांडे शिलेदार भेटले. एका तरुणाने आपली नोकरी सुटल्यावर (कंपनी बंद झाल्याने) गावी येऊन लोकांना एकत्र करून पाणी आणि सामूहिक शेती करायला सुरुवात केलीय. एक मुलगी पुण्याला नर्स म्हणून काम करते, ती सुट्टीत गावी येऊन झाडं लावते. तिने एकटीने आजपर्यंत ५५०० झाडं लावून जगवली आहेत. असे अनेक अनाम शिलेदार या कामाच्या निमित्ताने बघायला मिळाले. आणि लक्षात आलं की फेसबुक किंवा सोशल मीडिया वरचं वातावरण, विषय, वाद, इत्यादि, त्यातलं कोणतंही माध्यम बहुसंख्य लोकांना उपलब्ध नसताना ते करत असलेलं काम यात कुठेच नाहीये. कदाचित हा प्राथमिकतेचा आणि "माझे प्रश्न मीच सोडवायचा प्रयत्न करेन" या मानसिकतेचा फरक असावा. पण मला हा फरक आवडला.
लोकसहभाग इतका चांगला आहे म्हटल्यावर सरकारी यंत्रणा पण मदतीला आली. मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घातलं आणि मग कोकण आयुक्त, जिल्हाधिकारी, प्रान्त, मुख्याधिकारी, तहसीलदार, इत्यादि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी स्वतः दिवसभर उपस्थित राहून आपला सहभाग दाखवून दिला. १ जानेवारी आणि रविवार असूनही हे सर्व अधिकारी दिवसभर या सर्व ठिकाणी श्रमदानासाठी हजर होते ही माझ्या दृष्टीने आनंदाची गोष्ट आहे. समाज आणि शासन एकत्र असतील तर मोठी कामं सहज होतात हे खरंच!
इतर कोणत्याही भागातील कामाचं अंधानुकरण न करता, योग्य जागी, योग्य पद्धतीने, योग्य काम केलं आणि एकच मोठं बांधकाम करण्या ऐवजी अनेक छोटी कामं योग्य अंतरावर योग्य जागा निवडून केली तर हे शक्य आहे. त्या दृष्टीने आम्ही काही जागा निवडून तिथे योग्य कामं सुचवली आहेत. काही लोकांनी पूर्वानुभवावरून निवडली आहेत. तिथे योग्य प्रकार कामं केली तर येत्या ४-५ वर्षांत नक्की चांगला फरक दिसून येईल.
राजेंद्रसिंगजी यांनी सांगितल्याप्रमाणे, "नीर, नारी और नदी इनका सम्मान ही समाज को प्रगती की ओर ले जाता है", हे लक्षात ठेवून काम केलं तर बारमाही नदया आणि शाश्वत विकास सहजशक्य आहे.
हे वर्ष अशाच चांगल्या अनुभवांचं जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना!
No comments:
Post a Comment