Saturday, 24 December 2016

डोंबिवली - एक प्रवास 1

डोंबिवली - एक प्रवास भाग १ 
यावर्षी पाऊस मस्त झाला. येताना ज़रा उशिरा आला खरा (लोकांच्या दृष्टीने, पण तसा तो गेली अनेक वर्षं पुढे सरकलाय. पण आपण हवामानखात्याच्या प्रमाणपत्रासाठी थांबू), पण सरासरीपेक्षा जास्त झाला. आणि यावेळी त्याने यायची दिशाही बदलली. तर हा पाऊस बघताना मला माझं लहानपण आठवलं.
जन्मापासून मी डोंबिवलीकर. पहिली दोन वर्षं जरी कर्जतला गेलेली असली तरी जन्म आणि आत्तापर्यंतचा काळ या गावातच गेलेला.  लहानपणाची डोंबिवली ही फारच मस्त होती. एक चांगलं गाव होतं ते, बरचसं गाव आणि शहर याच्यामधे असणारं पण गावाच्या जवळ जाणारं. छोटे छोटे रस्ते, बंगले, कौलारू घरं, दोन किंवा काही ठिकाणी तीन मजली इमारती, रस्त्याच्या बाजूला झाडं, गावात मधे मधे दिसणारी भातशेते, रामबाणाची आणि उंच गवताने भरलेल्या काही पाणथळ जागा, हे सर्रास दिसणारं दृश्य होतं.
माझे आई वडिल नोकरी करत असल्याने आमची (मी आणि बहिण) रवानगी काकांकडे व्हायची. सकाळी थोडावेळ टाइमपास करून नंतर शाळेत दिवस जायचा. काका पेंडसेनगर मधे राहात असल्याने ते शाळेला जवळ होतं. तेव्हाचं पेंड़सेनगर खूपच वेगळे होते. बरीचशी बैठी घरं किंवा बंगले, आणि काही हाताच्या बोटावर मोजता येतील अशा दोन किंवा तीन मजली इमारती. बराचसा भाग हा वापरात असलेल्या किंवा पडून राहिलेल्या भातशेतांचा. त्यामुळे खेळायला आणि फिरायला मजा यायची. मनुष्यवस्ती आत्ताच्या तुलनेत तर अगदीच कमी होती. बरीचशी माणसं एकमेकांना ओळखायची.
माझं बरचसं बालपण हे घरापेक्षा घराबाहेरच जास्त गेलंय. पूर्वी, सुदैवाने म्हणायला पाहिजे, टीवी, सिनेमा वगैरे फारसं प्रचलित नव्हतं, किमान आमच्या विश्वात तरी नव्हतं. त्यामुळे, शाळा सोडली तर बाकी काहीच व्याप नसायचा डोक्याला. काही मुलं शिकवणीला जायची (हल्ली ज्याला क्लासेस म्हटलं जातं ते), पण मी आणि आमच्या घरच्या लोकांना याची फार गरज वाटत नसल्याने तेही नव्हतं. त्यामुळे, शाळेव्यतिरिक्त असलेला वेळ हा खेळणं, फिरणं यात मस्त जायचा.
काका त्यावेळी एक बैठ्या चाळीत राहायचे. आजूबाजूला तशीच बैठी घरं आणि जवळच काही दोन मजली इमारती. त्यामागे नजर जाईल तोपर्यंत भातशेती. त्यावेळी बरीचशी लागवडीखाली पण होती. काही आंब्याच्या आणि पेरू, चिकूच्या बागा, जांभूळ आणि बोराची झाडं, चिंचेची काही प्रचंड मोठी झाडं, असा सगळा परिसर होता. बारा बंगला ते बावन चाळ आणि आजूबाजूच्या परिसरात चालत किंवा सायकलने फिरायला जाणं हा अत्यंत आवडीचा उद्योग होता.
घराच्या समोरच एक गोठा होता आणि बाजूच्या गल्लीतही एक गोठा होता. त्यामुळे, तिथे जाऊन म्हशी आणि गाईचं निरिक्षण करणं, दूध काढणं वगैरे गोष्टी बघणं हा वेळ घालवण्याचा एक उद्योग होता. त्या गोठ्याच्या बाजूला एक छोटा तलाव होता.
दोन इमारती सोडून एक मोठी विहीर होती. त्यात परिसरातील बहुतांश मुलंमुली, तरुण, मध्यमवयीन, सगळेच पोहायला जात असत. मीही कधी कधी जात असे पण शेवटपर्यंत पोहायला काही नीट जमलंच नाही. पण ते सर्व वातावरण एकदम छान असायचं.
त्यावेळी बरेचसे खेळ हे घराबाहेर खेळले जात. क्रिकेट हा सर्वात लोकप्रिय खेळ होता हे खरं, पण आम्ही ऋतुप्रमाणे खेळ खेळत असू. म्हणजे पावसाळा असेल तर भिजत क्रिकेट आणि फुटबॉल खेळायला मजा येत असेच पण आजूबाजूला भरपूर शेतांमुळे छोटी लोखंडी शिग घेऊन रुपवारुपवी हा खेळ खेळला जायचा. पावसाळ्याव्यतिरिक्त ऋतुमधे अनेक मैदानी खेळ खेळले जात असत. त्यात कबड्डी, खोखो, वॉलीबॉल हे खूप कॉमन होते.
मी तर कर्जतहून मामाकडून विटी दांडू करून घेऊन येत असे आणि मग शाळेत आणि नंतर घराच्या अंगणात खेळायला खूप धमाल यायची. त्याव्यतिरिक्त गोट्या हासुध्हा एक लोकप्रिय खेळ होता.
वेगवेगळ्या ऋतूंमधे चिंच, आवळा, आंबे, बोरे, पेरू, जांभळे वगैरे झाडं शोधून त्यावर चढून फळे काढून खायला मजा यायची. मला आठवतय की शाळेत असताना मधल्या सुट्टीत बाजूच्या गल्लीतल्या एक चिंचेच्या प्रचंड झाडावर चढून आम्ही चिंचा काढत असू.
आमची शाळा (स. वा. जोशी विद्यालय) छान होती. दोन छोट्या इमारती आणि चौफेर खेळण्यासाठी मैदान. मैदानी खेळांची आवड आणि अनेक स्पर्धांमधे सहभाग या गोष्टी शाळेमुळे सहज घडून गेल्या. त्याचा खूप चांगला परिणाम झाला एकूण आयुष्यावर, पण तेव्हा कळलंच नाही. तेव्हा फ़क्त मजा वाटायची. त्या सर्व गोष्टी मधून खूप शिकायला मिळत गेलं जे आत्ता जाणवतं.
आजुबाजुला काँक्रीटचं जंगल नव्हतं तर खरी झाडं भरपूर होती. त्यामुळे झाडं ओळखता येत असत. त्याचा फायदा अजूनही होतो. श्रावण महिन्यापासून वेगवेगळे सण सुरु होत. तेव्हा आजच्या तुलनेत धार्मिक भावना वेगळी होती.  आमच्याकडे गणपती कोकणातल्या घरी असायचे पण मला अजुन आठवतय की श्रावण भाद्रपद महिन्यात 'पत्री" गोळा करणं, रोजच्या पूजेसाठी फुलं गोळा करणं, यामुळे आमचं लक्ष चौफेर असे. तगर, डबलतगर, पारिजातक, जास्वंद, गुलाब, मोगरा, हजारी मोगरा, चाफा, सोनटक्का, शेवंती, अनंत, कोरांटी ही आणि अशी अनेक फुलझाडं लक्षात राहिली.
रस्त्याच्या बाजूला आणि अंगणात असलेली बकुळ, आकाशजाई (बुचाची फुलं), कदंब, करंज, सावर, पांगारा, पापडी, नीलगिरी, हाताला आणि डोक्याला लावतात ती मेंदी, कुंपणाला लावलेली कडू मेंदी, सागरगोटा, निवडुंग, अडुळसा, शेवगा, वड, पिंपळ, उंबर, गुलमोहर, पेरू, चिकू, सीताफळ, रामफळ वगैरे झाडं सहज दिसायची.
कवठी चाफा, कैलासपती, शमी अशी काहीशी दुर्मिळ दिसणारी झाडंही दिसत असल्याचं आठवतं.
या सर्व हिरवाई मुळे संपन्न पक्षी आणि कीटक जग बघायला मिळत असे. स्वर्गीय नर्तक, हळदू, तांबट, शिंपी, सुतार, घार, कोतवाल, खाटिक, पोपट, वेडा राघु, खंड्या, भारद्वाज, वगैरे अनेक पक्षी, असंख्य प्रकारचे कीटक आणि फुलपाखरं हे सर्व रोजच्या जीवनाचा भाग होते. लहान असताना मला आठवतय की नवरे कंपाउंड मधे मी मोर नाचताना पाहीलाय
शेतांमुळे साप भरपूर दिसत. पण त्याचा कधीच त्रास झाला नाही. ते आपणहून जात किंवा घरात शिरले तर त्यांना पकडून बाहेर सोडत असू. मारण्याचं प्रमाण तसं कमी होतं.
एकूण जीवनशैली अशी होती की त्यामुळे आपण आजूबाजूच्या पर्यावरणाशी सहज जोडले जायचो. निसर्गाशी चांगला संपर्क आणि संवाद होता. यातून निसर्गचक्र अजाणतेपणी मनात कोरलं गेलं असावं असं आता वाटतं.
हा काळ साधारण 1975 ते 1982 पर्यंतचा. पण त्यानंतर अचानक जसा "विकास" वेगाने व्हायला लागला आणि शहरीकरण जोरात सुरु झालं, तसे त्याचे परिणाम मानवी स्वभाव आणि पर्यावरण, या दोन्हीवर दिसायला लागले आणि गावाचं रूप आणि स्वरुप बदलायला लागलं. (क्रमशः)
(महाराष्ट्र टाइम्स, ठाणे प्लस, २७.११. २०१६) 

    

No comments:

Post a Comment