Monday, 26 December 2016

डोंबिवली - एक प्रवास भाग २

डोंबिवली - एक प्रवास भाग २ 
७८-८० सालापासून डोंबिवलीची शहर बनण्याकडे वाटचाल सुरु झाली. तेव्हा ती तशी लगेच लक्षात आली नाही पण आता विचार करताना कळते. तेव्हाचं आमचं विश्व हे तसं मर्यादित असल्याने फार गोष्टी लगेच कळल्या नाहीत. 
अचानक आमच्या लक्षात यायला लागलं की आपल्या खेळण्याच्या जागा कमी व्हायला लागल्या आहेत. जिथे हिरवी शेतं होती, मोकळी मैदानं होती, तिथे मधेच बांधकामाची तयारी किंवा सुरुवात दिसायला लागली. चाळी पडून त्याजागी इमारती उठताना दिसायला लागल्या. पण चाळीतून चांगल्या घरात जायला मिळेल या आनंदात असल्याने आणि अनेक प्रस्तावित सोयींमुळे बाकी दुर्लक्ष झालं असावं बऱ्याच लोकांचं. 
पूर्वी डोंबिवली आणि आजुबाजूची छोटी गावं यात पाणी भरपूर होतं. जुन्या डोंबिवलीकरांना हे नक्की आठवत असेल की पूर्वी खूप विहिरी होत्या, अनेक तळीं होती. पाणथळ जागा अनेक ठिकाणी होत्या.  जसजसं गाव वाढत गेलं, तशा या पाण्याच्या जागा कमी कमी होत गेल्या. माझ्या आठवणीत तर खूप  विहिरी होत्या ज्या माझ्या डोळ्यांसमोर बुजवल्या गेल्या. "विकास" नावाची एक गोंडस कल्पना एवढी प्रभाव टाकून गेली होती की त्याचे परिणाम फार कोणाला कळलेच नाहीत. खरंतर अजूनही अनेकांना ते जाणवत नाहीयेत असंच बोलण्यावरून आणि वागण्यावरून वाटतं.
बाजीप्रभू चौकात पूर्वी मारुती मंदिर होतं, त्याच्या बाजूला एक मोठी विहीर होती. तिथे गणेश विसर्जन होत असे. त्या परिसरात ३ विहिरी होत्या. आता एकही दिसत नाही. पेंड़सेनगर, रामनगर, टिळकनगर, आयरे रोड आणि गाव,  गोग्रासवाडी, पांडुरंगवाडी या सर्व ठिकाणी अनेक मोठ्या विहिरी  होत्या, काही तलाव होते. पण जशी या भागाची वाढ लवकर आणि वेगाने झाली, तशा त्यात इथल्या विहिरी, रामबाणाची बेटं असलेल्या पाणथळ जागा, मैदानं, इत्यादि  गोष्टी हळूहळू लुप्त व्हायला होत गेल्या.
८० सालानंतर औद्योगिक विकास झपाट्याने वाढला आणि त्यामुळे नागरीकरण पण वेगाने  वाढत गेलं. अचानक ४ मजली इमारती दिसायला लागल्या. पावसाळ्यात आपल्याला अचानक भू छत्रं वाढलेली दिसावीत तशा या इमारती बघुन मला वाटायचं. कित्येक इमारतींमधे  तर इतकी कमी जागा होती की वारा किंवा उजेड़ही रस्ता न मिळाल्याने तिथे पोहोचत नसत. आजही अशा अनेक इमारती पहायला मिळतात.
गाव वाढत गेलं तसे बरेच अनोळखी चेहरे दिसायला लागले. हे सण आणि उत्सवाच्या विशेष जाणवायचं. माझ्या आठवणीतला  गणेशोत्सव हल्लीच्या तुलनेत एकदम वेगळा आणि छान असायचा. खूप चांगले कलाकार आपली कला सेवा म्हणून सादर करायला येत. अनेक मोठे कलाकार (गायक, नट, एकपात्री कलाकार), लेखक, कवी, अनेक विचारवंत ऐकायला आणि बघायला मिळत.
दिलीप प्रभावळकर, प्रा. लक्ष्मण देशपांडे यांचे प्रयोग त्याकाळी सहज बघायला मिळत आणि हे आणि इतर मोठे कलाकार इतके साधे होते की तेही सहज लोकांमधे, मुलांमधे मिसळत असत.
गाण्याचे  आणि व्याख्यानांचे अनेक चांगले कार्यक्रम होत असत. या सर्व कार्यक्रमात लोक मोठ्या संख्येने सहभागी होत असत.  त्याकाळी टीव्हीचं नसलेलं प्रस्थ आणि सोशल मीडिया नसल्याने लोकांना एकमेकांशी बोलायला आणि भेटायला मिळणारा वेळ हे कदाचित त्या मागचं एक महत्त्वाचं कारण असू शकेल.
त्याकाळी गणेशोत्सव म्हणजे अशा चांगल्या कार्यक्रमांची मेजवानी असे. नंतर गणेशोत्सवातले अनेक कार्यक्रम तर १० ऐवजी ५ दिवस किंवा ७ दिवसांवर आले. सगळा भर मिरवणुक किती झगमगाटात आणि आवाजात होते यावर लोकांचं लक्ष केंद्रित व्हायला लागलं.
त्यानंतर दिवाळीचे कार्यक्रम जोरात आणि दिमाखदार व्हायला लागले, नव वर्ष स्वागत यात्रा निघायला लागल्या. पण बाकी कार्यक्रमांचा दर्जा जो खाली गेला तो गेलाच.
उत्सव साजरा करायच्या, मनोरंजनाच्या व्याख्या बदलत गेल्या. जगण्याचा वेग वाढत गेला. आणि खूप वेगात जाताना आपल्याला जवळचं स्पष्ट दिसत नाहीच हा अनुभव येतोच की आपल्याला. तसेच वेगाने सर्व आनंद पटापट उपभोगून टाकण्याच्या घाईमधे खूप मौल्यवान आठवणी आणि गोष्टी आपण गमावतोय हेच बहुदा विसरलं गेलं.
वाढत्या शहरीकरणाचे परिणाम आम्हाला आमच्या शाळेत पण दिसायला लागले. खरंतर आमच्या जोशी हायस्कूलला ५ मैदानं होती. २ लहान आणि ३ मोठी. शाळेच्या २ इमारती होत्या. मैदानं असल्याने आणि खेळण्याची हौस असल्याने शाळेत असताना आंतरशालेय आणि जिल्हास्तरीय स्पर्धांमधे भाग घेता यायचा. दहावीत असताना अजुन एक इमारत येणार असं नक्की झालं आणि मैदान आक्रसायला लागलं. मुलांचाही मैदानी खेळांकडे असलेला कल जरा कमी व्हायला लागला. आम्ही शाळेत असताना कबड्डी, खोखो, लांब उडी, ऊंच उडी वगैरे खेळ खेळत असूच पण त्या व्यतिरिक्तही क्रिकेट, फुटबॉल (विशेषतः पावसाळ्यात मैदानात चिखल झाला की) भोवरा, गोट्या, उन्हाळ्यात पतंग उडवणे इत्यादि खेळ मुलांमधे प्रिय होते. आम्ही तर गच्चीत क्रिकेट, आटया पाट्या खेळत असू. शाळेमधे असताना बुद्धिबळ हा पण एक चांगला प्रचलित खेळ होता. हौशी लोकांसाठी स्पर्धाही होत. सध्या काय होतं ते माहित नाही. पण एकूणच मुलांचा ओढा मैदानी खेळांकडे जास्त होता, किमान माझ्या पाहण्यात तरी.
शाळा संपली आणि कॉलेज चालू झालं. कॉलेज गावातच होतं, पेंढरकर कॉलेज. त्यावेळी ते गावाबाहेर वाटायचं. शेलारनाका ओलांडला की नंतर दृश्य बदलून जात असे. सध्याचं MIDC चं तरणतलाव, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, दुकानं, अर्धवट बांधकाम होऊन आणि पूर्ण होऊन बंद असलेले व्यावसायिक गाळे, सावित्रीबाई फुले नाट्यगृह, इत्यादि असलेलं मैदान पाहणाऱ्या लोकांना पूर्वीच्या मैदानाची कल्पना येणं कठीण. पूर्वी तिथे फक्त पेंढरकर कॉलेजची एक इमारत आणि एक शेड वजा, वर पत्रे असलेली, बैठी इमारत आणि  लांब असलेलं टेलीफोन एक्सचेंज, एवढंच होतं. बाकी सर्व मैदान होतं. सध्या ते निम्म्याहून कमी झालंय.
हे मैदान, नेहरू मैदान, भागशाळा मैदान, रेल्वे मैदान आणि DNC शाळेचं मैदान या जागा सर्व वयोगटाच्या मुलांसाठी उपलब्ध असायच्या. मला आठवतय की सुटटीमधे पहाटे ६ वाजता मैदानात जाऊन चांगलं पीच अडवून मग आपापल्या हिमतीप्रमाणे जमेल तेवढा वेळ खेळणे हे उद्योग असे. हिमतीप्रमाणे म्हणण्याचं कारण असं की जास्त उन्हात खेळल्यावर घरी चांगली पूजा होत असे. आणि मोठ्या माणसांना घाबरायची आणि त्यांचं ऐकायची पद्धत बरीच रूढ होती तेव्हा.        
आम्ही राहत होतो तिथे आजूबाजूला मस्त झाडं होती. आंबा, चिंच,  विलायती चिंच, बोर, पेरू, चीकू वगैरे फळझाडं होती. सोनचाफा, पारिजातक, अनंत,  तगर,नाना तऱ्हेच्या जास्वंदी, कोरांटी, आईने आवडीने आणलेली अबोली, बटन शेवंती, इत्यादि फुलझाडं होती. वड, पिंपळ, उंबर, करंज, अशोक, बकुळ, विलायती फणस, फणस, सीताफळ, नारळ, सुपारी, इत्यादि झाडं होती. त्यामुळे खूप आणि खूप प्रकारचे पक्षी बघायला मिळत असत. समोर रामबाणाचं बन होतं. रात्री त्या बनाजवळून जायला भीति वाटायची. त्यात तिथे एक चिंचेचं मोठं झाड़ होतं. काळोखात जाऊन तय झाडाला हात लावून यायची पैज लागायची.
आज हे सगळं आठवलं की हसू येतं, कारण ना ते रामबाण राहिले ना चिंचेचं झाड़. जिथे हे सगळं होतं, तिथे इमारती उभ्या राहिल्या आणि काँक्रिटचं जंगल उभं व्हायला लागलं. हिरवाई कमी होताना  कळत होती पण त्याचा होणारा परिणाम तेवढा लोकांच्या लक्षात येत नव्हता.
जगातलं एक आश्चर्य म्हणता येईल असा MIDC मधे निवासी भाग जोरात वाढायला लागला. लोक पहाटे उठून व्यायामाला तिकडे जायला लागले, अजूनही जातात. मला तर त्या भागात फिरताना हा फेनॉलच्या वास, हा हैड्रोजन सल्फाइडचा, वगैरे ओळखता यायचे. अजूनही येतात.
वस्ती अनिर्बंध वाढल्याचा पहिला परिणाम पाण्याच्या पुरवठ्यावर झाला. आता योग्य नियोजन आणि अंमलबजावणी अभावी हळूहळू फसत चाललेल्या "विकासाचे" परिणाम दिसायला लागले...  (क्रमशः)
(महाराष्ट्र टाइम्स, ठाणे प्लस, ५. १२. २०१६)   


      

No comments:

Post a Comment