Thursday 2 March 2017

सरकारी पातळीवरील ठोकळेबाज उपाय - उपाय की अपाय?

सरकारी पातळीवरील ठोकळेबाज उपाय  - उपाय की अपाय?

४ दिवसांपूर्वी एका पार्लेश्वर रोटरी क्लब बरोबर शहापूर तालुक्यातील माळ नावाच्या गावात गेलो होतो. गावाला पाण्याची टंचाई आहे आणि ३ महिने पाण्यासाठी वणवण करावी लागते. गाव उंच पठारावर आहे आणि सर्व बाजूंनी उतार असल्याने पाणी वाहून जाते आणि टंचाई निर्माण होते अशी परिस्थिती आहे. गेली २ वर्षं हा प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही पार्लेश्वर रोटरी क्लब बरोबर प्रयत्न करात आहोत. यावर्षी बांधकाम करून पाणी साठवणं आणि जमिनीत मुरवणं यासाठी काम चालू करायच्या तयारीने गेलो असताना धक्कादायक प्रकार दिसला. तो लोकांपुढे यावा आणि अशा प्रकारामुळे होणारं नुकसान लोकांपुढे यावं म्हणून हा लेखप्रपंच. 
माळ गावात एक विहीर आहे जी मार्च मधे कोरडी होते. त्यानंतर गावकरी साधारण ८०० मीटर अंतरावर  असलेल्या बंधाऱ्याकडे जातात पाण्यासाठी. तिथे गुरं येतात, कपडे धुतले जातात, भांडी घनसाली जातात. त्यामुळे पाणी लवकर खराब होतं. सुदैवाने, तिथे एक जवळजवळ बारमाही झरा आहे, ज्याचं पाणी पिण्यासाठी वापरता येतं. बंधारा १२-१३ वर्षं जुना आहे. खूप गळती आहे, भिंत फुटली आहे, गाळ साठलाय, त्यामुळे पाणी जास्त काळ टिकत नाही आणि दर्जा वाईट असतो. त्यातून गावात आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात. 
अभ्यास करून एक योजना तयार करून आम्ही कामाला लागलो. या योजनेत विहिरीची दुरुस्ती करणं, विहिरीच्या खालच्या पातळीवर भूमिगत बंधारा बांधणें, जुन्या बंधाऱ्यातील गाळ काढणे, झऱ्यासमोर कुंड बांधून त्याचं आयुष्य २ महिन्यांनी वाढवणे आणि एक नविन बंधारा बांधणे, या गोष्टी आहेत. 
आत्ता गावात गेलो तेव्हा पाहिलं की जुन्या बंधाऱ्याच्या जवळ जिल्हा परिषदेच्या माध्यमातून नविन विहिरीचं काम अचानक सुरु झालंय आणि ते कंत्राटदाराच्या माध्यमातून सुरु आहे. अत्यंत चुकीच्या जागी २२ फूट व्यासाची आणि ३० फूट खोलीची विहीर करायचा प्रयत्न आहे. सध्या फ़क्त ५ फुट खोल खणून झालंय आणि दगड लागला आहे म्हणून काम थांबलंय. 
गावकऱ्यांमधे चर्चा होती की आता सुरुंग लावून, दगड फोडून ३० फुट खोल जाणार कारण तसं कॉन्ट्रैक्ट मधे ठरलंय. हे ऐकून मला प्रचंड धक्का बसला. यात अनेक धोके आहेत. 
१. विहीर चुकीच्या जागी, उतारात, झरे नसलेल्या जागी होतेय, त्यामुळे खर्च वाया जाणार 
२. सुरुंग लावून विहीर खोल करून उपयोग नाही कारण झरे नसल्याने ती पाण्याची टाकी होणार
३. जुना कमकुवत बंधारा जेमतेम १५० मीटर वर आहे. सुरुंग लावले की त्या धक्क्याने बंधाऱ्याला धोका पोहोचू शकतो आणि सध्याची परिस्थिति पाहता तो पडण्याचीच शक्यता जास्त आहे 
४. या उद्योगामुळे आहे ते पाणी वाहून जाण्याची भीती आहे 
५. गावकऱ्यांना एवढाच पाण्याचा स्त्रोत असल्याने ऐन उन्हाळ्यात पाण्याची परिस्थिती बिकट होणार आहे 
६. सरकारी पैसा, माणसांचे श्रम वाया जाणार आहेत 
७. यानंतर तिथे कोणतंही पाण्याचं काम होऊ शकणार नाही 
दुर्दैवाने, हे ना लोकांना कळतंय, ना कॉन्ट्रक्टरला, ना सरकारी पातळीवर काही विचार दिसतोय. सर्व संबन्धित लोकांना ही माहिती दिलीय पण अजुन काही प्रतिसाद नाहीये. 
एकीकडे स्वयंसेवी संस्था आणि देणगीदार याच्या मदतीने पाणी प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न चालु आहेत आणि दुसरीकडे सरकारी पातळीवरील अनास्था आणि स्थानिक परिस्थितीचा अभ्यास न करता टारगेट पूर्ण करण्यासाठी केली जाणारी कामं, यामुळे खूप प्रतिकूल वातावरण तयार होतंय. 
स्थानिक भौगोलिक परिस्थिती, लोकांची गरज, व्यवहार्य योजना यावर योग्य माणसांचा सल्ला घेऊन काम केलं तर अशी विचित्र परिस्थिती निर्माण होणार नाही हे लक्षात घ्यायची आवश्यकता आहे.  
  
    
  

1 comment:

  1. Have you changed your number. Trying hard to reach you.

    ReplyDelete