हा लेख लिहावा का? का लिहावा? यावर कालपासून खूप विचार करून शेवटी लिहायला घेतला. कारण अशा वस्तुस्थिती दाखवणाऱ्या लेखांची आवश्यकता आहे असं मनापासून वाटलं.
२६ मार्चला उल्हासनगर आणि डोंबिवली येथे वालधुनी नदी पुनरुज्जीवन मोहिमेची सुरुवात झाली. डॉ राजेंद्रसिंग, महाराष्ट्र नेचर पार्कचे अविनाश कुबल, इंस्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्सचे पदाधिकारी आणि सभासद, चांदीबाई कॉलेज, विविध संस्था, दहिसर नदी पुनरुज्जीवन समितीचे सदस्य आणि लोकांच्या सहभागातून सकाळी ८ वाजता नदीची परिक्रमा करून (उल्हासनगर भागातील) त्यानंतर चांदीबाई कॉलेज मधे एक सभा होऊन त्यात या नदीच्या पुनरुज्जीवनासाठी काय आणि कसे प्रयत्न करावेत या दृष्टीने काही मुद्द्यांवर चर्चा झाली.
संध्याकाळी डोंबिवली जिमखाना येथील सभागृहात या विषयावर वेगवेगळी प्रेझेंटेशन झाली. शेवट डॉ राजेंद्रसिंग यांच्या मनोगताने झाला.
या दोन्ही घटनांमधे जे अनुभवलं ते सर्वांना सांगावं हा या लेखाचा हेतू.
उल्हासनगरची लोकसंख्या काही लाखांत आहे. नदी प्रचंड प्रमाणात प्रदूषित आहे. कारखाने आणि निवासी विभागातील सांडपाणी सर्रास नदीत सोडलं जात आहे. नदीच्या पाण्याचा रंग, त्याला येणारी दुर्गंधी, हे सर्व त्या नदीवर जे अत्याचार केले जात आहेत ते स्पष्टपणे दाखवत आहेत. विविध सरकारी योजना तयार होऊन, त्यातून काही योजनांमधे खर्च होऊन गेलाय पण नदीची परिस्थिती आणखी वाईट होत चाललीय.
या सर्व पार्श्वभूमीवर पाणी क्षेत्रातील नोबेल समजले जाणारे स्टॉकहोम वॉटर प्राइज मिळालेले, जगावर चांगला परिणाम घडवणाऱ्या ५० लोकांमधे ज्यांचं नाव घेतलं जातं ते, ७ नदया यशस्वीपणे पुनरुज्जीवित करणारे डॉ राजेंद्रसिंग या कामात मदत करायला, सहभागी व्हायला येतात, तेव्हा त्यांच्यासमोर जेमतेम १०० माणसं असतात, आणि त्यातली ५० टक्के बाहेरगावातून आलेली असतात, स्थानिक लोक फारच कमी दिसतात, हे फारच धक्कादायक होतं. त्यातल्या त्यात जमेची बाब म्हणजे उल्हासनगरच्या २ नगरसेविका यात सहभागी झाल्या होत्या.
संध्याकाळी तर आणखी कठीण परिस्थिती होती. डोंबिवली जिमखाना मधल्या कार्यक्रमाला उपस्थिती जेमतेम ५०-६० लोकांची. त्यात नदीच्या पुनरुज्जीवनाबद्दल उपाय सुचवणारे कमी.
या कार्यक्रमाला असलेली उपस्थिती, लोकांची मानसिकता दाखवते. हा कार्यक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यात आयोजक कमी पडले किंवा अशा कार्यक्रमात रविवार संध्याकाळ वाया घालवावी असं लोकांना वाटलं असावं का असाही प्रश्न पडतोय.
पाणी, पर्यावरण, निसर्ग याकडे आपण कसं बघतोय याचं हे निदर्शक आहे. या कार्यक्रमाला माणूस जोगेश्वरीहून आला होता, म्हणजे इच्छा असेल तर हे शक्य आहे.
डॉ. राजेंद्रसिंगजी यांनी सांगितल्याप्रमाणे, "नदी, नीर और नारी का सम्मान ही समाज को प्रगती की तरफ ले जाता है", या विधानावर खूप गांभीर्याने काम करायची गरज आहे.
पाणी, पाण्याचे स्त्रोत, नदया, तलाव इत्यादि जीवनवाहिनी जपण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करायची गरज आहे. आपण आपल्या पुढच्या पिढीसाठी काय वातावरण तयार करून ठेवतोय याचा किमान आता तरी विचार करून, आवश्यक कृती करायची वेळ आलीय.
काही लाखांची लोकवस्ती असलेल्या शहरात सुट्टीच्या दिवशी संध्याकाळी एवढया महत्वाच्या विषयावर मार्गदर्शन करायला एक अनुभवी मार्गदर्शक येतो आणि त्याची गंधवार्ताही सामान्य नागरिक, प्रतिष्ठित, स्वयंसेवी संस्था, पत्रकार यांना नसते किंवा त्याचं महत्व यापैकी कोणाला वाटत नाही हे माझ्या दृष्टीने खूप गंभीर आहे. आणि अशा वागण्याचे दुष्परिणाम आपण भोगत असतानाही आपल्या वागण्यात बेफिकीरी आहे, योग्य काम करायची इच्छा दिसत नाहीये, जाणीव दिसत नाहीये, यावरून भविष्यात काय वाढून ठेवलंय याचा अंदाज येतोय.
आपण या जगाचे मालक नाही, मागच्या पिढीकडून पुढच्या पिढीकडे हा वारसा आपल्याला द्यायचाय की आहे ते आळस, दुर्लक्ष, बेफिकीरी यात संपवून सगळं भकास करून टाकायचं हे नक्की करून त्याप्रमाणे प्रत्यक्ष काम करायची गरज आहे.
To even think of cleaning the river which passes through Ulhasnagar is itself reassuring. At least a beginning has been made towards that. I am sure as more and more come to know of it people will join the movement.we need to create awareness among schools, college, housing societies and pressurise the civic body to do their job.
ReplyDelete