Monday, 20 March 2017

लोक सहभागातून पर्यावरण संवर्धनाचा सांस्कृतिक वारसा - देवराई

लोक सहभागातून पर्यावरण संवर्धनाचा सांस्कृतिक वारसा - देवराई
डॉ. उमेश मुंडल्ये  

वेगाने वाढणारी शहरं, औद्योगिकीकरण, लोकसंख्येचं ध्रुवीकरण, या आणि अशा अनेक गोष्टींमुळे निसर्गाचा समतोल ढळतोय आणि त्यामुळे पाणी, जंगलं, एकूणच जीवसृष्टीवर त्याचा खूप वाईट परिणाम होतोय. यात सर्वात वाईट भाग असा की या गोष्टीचं आकलन खूप कमी लोकांना दिसते आणि या गोष्टींवर प्रत्यक्ष काम करून योग्य प्रकारे संवर्धन आणि संरक्षण करणं हे तर फार दुर्मिळ आहे.
वाढती लोकसंख्या, शहरीकरण, आणि मानवकेंद्रित विकास यामुळे शेतीची जमीन, जंगलं कमी आणि विरळ होत चालली आहेत, पाण्याचे स्त्रोत, वृक्षसंपदा कमी होत चालली आहे. याचा गम्भीर परिणाम पर्यावरण आणि नैसर्गिक स्त्रोतांवर होतोय. 
शिल्लक असलेली जंगलं टिकवण्यासाठी आणि वाचवण्यासाठी सरकारी पातळीवर अनेक कायदे केले गेलेत आणि अजूनही केले जातायत. परन्तु, जैवविविधतेचे महत्त्व फार कमी लोकांपर्यंत पोहोचले आहे. आपण जीवसृष्टीच्या केंद्रस्थानी नसून केवळ एक भाग आहोत आणि फ़क्त आपणच निसर्गाचं शोषण करतोय (माणसा व्यतिरिक्त इतर कोणताही प्राणी निसर्गाचं शोषण करत नाही) त्यामुळे जैव विविधता आणि नैसर्गिक स्त्रोत यांचं संवर्धन आणि संरक्षण ही आपली जबाबदारी आहे हे ओळखून माणसाने कृती करायला हवी. त्यासाठी जाणीव जागृति करत राहण्याची गरज आहे. 
जरी सध्या अनेक लोक पर्यावरण संवर्धन आणि संरक्षण यासाठी काही उपाय सुचवत असले तरी त्यातले बरेचसे उपाय हे मानवाला केंद्रस्थानी मानून चाललेत. त्यामुळे योग्य परिणाम होत नाहीये. तात्पुरती मलमपट्टी करणं चालू आहे. बहुतेक ठिकाणी "संरक्षण दुसर्याने करावं, मी उपभोग घेईन" ही मनस्थिती दिसतेय.
सरकारी पातळीवर संरक्षणाचा भाग म्हणून विविध भाग संरक्षित करणं (अभयारण्य, National Parks, Biosphere Reserves, Gene Banks, वगैरे) आणि वेगवेगळे कायदे करणं हे दिसते. पण यात या सर्व प्रक्रियेतून माणूस बाजूला काढला जातो. त्यामुळे हे उपाय लोक सहभागाविना अयशस्वी होताना दिसतात. 
दुसरीकडे, शहरांची पाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी बांधली जाणारी धरणं, त्यामुळे होत असलेली मातीची धूप, शहरांचं बाजूच्या शेतजमिनीवर होत असलेलं आक्रमण, त्यामुळे जंगलं तोडून केली जाणारी शेती, वैध, अवैध खाणी, जंगलांमधून गोळा केलं जाणारं वनोपज, अवैध आणि बेलगाम चराई या गोष्टींमुळे वन संवर्धन आणि संरक्षण करण्याच्या प्रयत्नांना खीळ बसते. त्यातच जंगलं कमी झाल्याने वन्य प्राण्यांनी जवळच्या मानवी वस्तीवर अन्नासाठी हल्ले करणं, त्यात मनुष्य हानी होणं, त्यामुळे, लोकांनी वन्य प्राण्यांना मारणं, इत्यादि गोष्टी होतात. त्यामुळे सर्व संरक्षण आणि संवर्धन प्रक्रिया वादात सांपडते. या प्रकारांमुळे साधी जंगलं तर जाऊ देत, संरक्षित जंगलांचं संरक्षण कठीण गोष्ट झालीय. 
यातच भर म्हणून कि काय, मिश्रवनं निरुपयोगी समजून ती तोडून तिथे पैसे देणाऱ्या झाडांची लागवड केली जातेय आणि सरकार विविध सवलती आणि योजनांद्वारे त्याला पाठिंबा देत आहे. यात पर्यावरण संतुलन कुठेच विचारात घेतलं जात नाहीये. त्यामुळे ही विविधता आणखी कमी होत चाललीय.     
सुदैवाने, लोक सहभागातून जीव विविधतेच संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी भारताला परंपरेने एक सुदृढ आणि पुरातन वारसा दिला आहे. एखादी गोष्ट जर दीर्घकाळ यशस्वीपणे चालू ठेवायची असेल तर ती लोकांच्या जगण्याचा एक भाग झाली पाहिजे या गोष्टीची जाण आपल्या शहाण्या पूर्वजांना असावी. त्यांनी निसर्गातील अनेक घटक देव किंवा देवाचे प्रिय घटक मानून त्यांचं संरक्षण करण्याची प्रथा वेगवेगळ्या कारणांनी चालू केली. यात नद्या, तलाव, विविध डोंगर शिखरं, विविध वनस्पती आणि प्राणी, इत्यादि गोष्टींना धार्मिक महत्त्व देऊन त्यांचं संरक्षण आणि संवर्धन पिढ्यानपिढ्या केलं. यातला एक आणि सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे "देवराई". 
देवराई म्हणजे देवाच्या नावाने राखून ठेवलेलं जंगल. हे जंगल देवाला अर्पण केलेलं असल्याने याची तोडकेली जात नाही. या जंगलातील सर्व गोष्टी धार्मिक भावनेने पिढ्यानपिढ्या सांभाळल्या जातात. हे देवाचे जंगल आहे त्यामुळे यातील कोणत्याही गोष्टीचा वापर व्यापारासाठी करायचा नाही, कोणतंही झाड तोडायचं नाही या ठाम भावनेने या देवरायांच संरक्षण केलं जातं. देवराईला कुंपण किंवा संरक्षक भिंत नसते, कोणी राखणदार नसतात, पण तरीही केवळ धार्मिक भावनेने या जंगलांच रक्षण केलं जातं. सामाजिक बंधन हा सर्वात जास्त परिणामकारक ठरणारा घटक आहे. 

देवराई कशी दिसते - 
एखाद्या परिसरात फिरताना उजाड परिसरात किंवा शेतांमध्ये अचानक चांगला जंगलाचा राखलेला भाग दिसला कि ज्यात शिरणं कठीण आहे किंवा जो एकदम वेगळा दिसतोय किंवा एखादं उत्तम दर्जाचं जंगल आहे, समजावं कि ही देवराई आहे.
देवराई नुसती फोटो बघून किंवा वर्णन वाचून कळत नाही, प्रत्यक्ष अनुभवण्याची आहे. कोणत्याही चांगल्या देवराईत शिरल्यावर आपला बाकी जगाशी संपर्क जवळपास तुटतो. आतलं आणि बाहेरचं तापमान, आर्द्रता यात जाणवण्याएवढा फरक अनुभवायला मिळतो. आत शिरल्यावर आपल्याला दिसतात ते उंचच उंच वृक्ष, त्यावर असणार्या अनेक आकाराच्या वेली, गच्च झाडोरा आणि विविध पक्षी, प्राणी यांचे आवाज आणि बरेचदा दर्शन. कुठे तरी वाहणार्या ओढ्याचा किंवा नदीच्या पाण्याचा आवाज, पक्ष्यांचा किलबिलाट, माकडं, भेकरं, पिसोरी, मोर, ककणेर, घुबड, दयाळ, नंदन नाचण, राजगिधाड, अशा अनेक पशुपक्ष्यांच दर्शन होतं. काही देवरायांमधे तर शेकरू आणि तिची घरटी दिसू शकतात. घाटमाथ्यावरच्या देवराईमधे अनेकदा सर्पगरुड़ पहायला मिळतो.  
देवराईच्या मध्यावर किंवा एका बाजूला एखादं मंदिर असतं. निसर्गातूनच आलेला देव किंवा देवी असते. ती त्या देवराईची आणि गावाची राखण करते. एखादा झरा किंवा ओढा असतो. क्वचित एखादी नदी उगम पावते. अनेक दुर्मिळ झाडं दिसतात. एकून वातावरण एकदम वेगळंच असतं, कोणीही भारावून जावं, शांत व्हावं अशी किमया हे देवराई मधलं वातावरण घडवून आणतं.


देवराई कुठे आढळते? - 

सर्वसाधारणपणे, देवराई गावाच्या सीमेवर आढळते. पण याचा अर्थ ऐसा नाही की देवराई एखाद्या विशिष्ट ठिकाणीच आढळते. देवराई गावात असू शकते, गावाच्या सीमेवर असू शकते, गावापासून लांब असू शकते, जंगल आणि गाव याच्यामध्ये असू शकते. अनेक ठिकाणी तर एकाच गावाच्या प्रत्येक वाडीत एक याप्रमाणे देवराया दिसून येतात. ही सार्वजनिक जंगलं आहेत. बहुतांश देवरायांमधे पाण्याचा एक तरी स्त्रोत असतो.
महाराष्ट्राचा विचार केला तर देवराया पश्चिम घाटाच्या आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळतात. तसंच सातपुडा डोंगर रांगा, यवतमाळ, नांदेड़ जवळील आदिवासी भाग, भंडारा, गड़चिरोली, वगैरे भाग जिथे आदिवासी वस्ती आहे त्या भागात देवराया आढळतात. मराठवाडा आणि पश्चिम विदर्भ या भागात देवरायांची संकल्पना आढळत नाही किंवा त्याबद्दल काही नोंद नाहीये.
आजपर्यंत मी केलेल्या संशोधनात ३७८३ देवारायांची नोंद केली आहे.  मुंबई मध्ये तर एक देवराई समुद्रामधल्या बेटावर आहे. तिथे ओहोटीच्या वेळेला चालत जाता येतं. या देवराईत गोड्या पाण्यातील झाडं दिसतात.  
देवराई किती आकाराची असावी याचा काही नियम नाहीये. कधी ती एका झाडाची असते (खरंतर एक मुख्य वृक्ष आणि त्यावर असंख्य वेली असं चित्र दिसतं). किंवा कधी ती १०० एकरापेक्षा मोठी असते. पण, सर्वसाधारणपणे देवराई १० गुंठे ते १० एकर एवढ्या परिसरात पसरलेली आढळते. बरेचदा, गावाच्या मध्ये असणारी किंवा सीमेवर आढळणारी देवराई लहान असते पण हा नियम नाहीये.  देवराईचं महत्त्व हे तिच्या आकारमानापेक्षा त्यात मिळणार्या प्रजातींवर अवलंबून असतं. मला दिसलेली सर्वात मोठी देवराई २०० एकरपेक्षा मोठी आहे. 
देवराई मधील देव - 
देवराई मध्ये असणारे देव हे बरेचदा निसर्गातून आलेले देव असतात. उदा. वाघजाई, काळकाई, शंकर, भैरी, वगैरे. अनेक देवरायांमध्ये हे देव उघड्या आभाळाखाली किंवा एखाद्या झाडाच्या खाली, पण उघड्यावर, असतात. देवराई मधल्या कोणत्याही गोष्टीची तोड झाली तर हे देव त्या दोषी माणसाला आणि त्याच्या वंशाला शिक्षा देतात अशी त्या गावातल्या लोकांची श्रद्धा असते आणि त्या श्रद्धेच्या आधारेच या देवराईचं रक्षण केलं जातं. अनेक देवरायांमध्ये तर देवाऐवजी भूत राखणदार असल्याचं बघायला मिळालं. 
जसजशी सुधारणा होत गेली किंवा शहरातल्या लोकांचा प्रभाव पडला किंवा राजकीय सत्तेचा किंवा अन्य धर्मीय सत्तेचा प्रभाव पडला तिथे तो या मंदिरांवरही दिसतो. पण एक गोष्ट नक्की, कि ही संकल्पना शेकडो वर्षांच्या परकीय आणि परधर्मीय सत्तेतही टिकून कायम राहिली. 
देवराई मधील जैवविविधता - 
देवराई तिथल्या घनदाट जंगलासाठी प्रसिद्ध आहेच पण ती तिथल्या जैवविविधतेसाठी जास्त प्रसिद्ध आहे. हे एक उत्तम दर्जाचं जंगल असतं, देवराई मध्ये त्या परिसरातील मूळ जंगलातील टिकून राहिलेली वन संपदा असते. कंदमुळे, गवताच्या अनेक जाती, जमिनीवर पसरणार्या वनस्पती, लहान मोठी झुडुपे, लहान मोठी झाडे, खूप उंच वृक्ष, त्यावर वाढणार्या वेली आणि इतर वनस्पती, शेकडो प्रकारचे पक्षी, वनस्पती, कीटक, फुलपाखरे, शेवाळे, बुरशी, जंगली प्राणी इत्यादि जीव सृष्टी देवराई अधिक समृद्ध करतात. अनेक प्रकारच्या दुर्मिळ वनस्पती, प्राणी, पक्षी, कीटक देवराईत सुरक्षित वातावरणात मोठ्या संख्येने आढळतात. 
आत्तापर्यंत मी केलेल्या संशोधनात वनस्पतींच्या सुमारे १४५० हून जास्त प्रजाती नोंदण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे, सुमारे १४० प्रकारचे  पक्षी, ८० हून जास्त प्रकारची फुलपाखरे, १८ हून जास्त प्रकारचे सरपटणारे प्राणी, भेकरे, पिसोरी, हरणे, साळींदर, खवले मांजर, माकडे, नीलगाय, गवा, रान मांजर, बिबट्या, इत्यादि वनजीवन सुरक्षितपणे जगताना दिसते.      
 देवराई मधील औषधी वनस्पती - 

देवराई तिथल्या औषधी वनस्पतीच्या भांडारासाठी प्रसिद्ध आहे. बाहेरच्या भागात दुर्मिळ असणारी झाडं इथे चांगल्या दर्जाची आणि मोठ्या प्रमाणावर आढळतात. गावातील जाणकार त्याचा वापर पैसे न घेता करतात. अनेक देवरायांमध्ये हल्ली झाड न तोडता बाकी गोष्टी वापरल्या जातात. 
इथे हिरडा, बेहेडा, आवळा, सर्पगंधा, गुळवेल, कावळी, धायटी, मुरुडशेंग, बकुळ, खैर, अमृता, अशोक, चित्रक, गेळा, गारबी, उक्षी, वाळा, कडू कवठ, रामेठा, पळसवेल, मोह, कुंभा, शिकेकाई, रिठा, इत्यादि शेकडो प्रकारच्या प्रजाती मिळतात.
एक गोष्ट नक्की की देवराई मधील कोणत्याही गोष्टीचा व्यावसायिक वापर करायला बंदी असते.
देवराई आणि गाव - 
देवराई हे गावाचं सांस्कृतिक केंद्र असतं. गावाचे सर्व उत्सव सार्वजनिकरित्या देवराई मध्ये साजरे केले जातात. अनेक गावांमध्ये मासिक ग्राम बैठक देवराई मध्ये घेतली जाते आणि त्यात गावाच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय सामुहिकपणे घेतले जातात. गावातील शाळा आणि मंदिराची दुरुस्ती या २ गोष्टींसाठीच देवराई मधील एखाद दुसरे झाड तोडायला ग्रामसभा क्वचित परवानगी देते. अन्यथा, झाड तोडणार्या व्यक्तीला दंड भरावा लागतो. एकूणच, गाव देवराई उत्तम रित्या जपतं.
काही ठिकाणी काही विशेष नियम असतात, उदा. तुम्ही देवराई मध्ये कोयता घेऊन जाऊ शकता पण कुर्हाड न्यायला बंदी आहे. याचं कारण सोपं आहे, कोयत्याने वाळलेल्या फांद्या तोडता येतात, कुर्हाड वापरून झाड तोड़ता येतं. किंवा, काही देवरायांमध्ये अनवाणी जायचं बंधन आहे. हे अजुन एक सोपा उपाय आहे लोकांना लांब ठेवायचा. कारण तुम्ही जंगलात फार काळ आणि अंतर अनवाणी जाऊ शकत नाही.
कारणाशिवाय त्या भागात जायचच नाही अशी योजना यामागे दिसून येते. त्यामुळे, जंगल दाट आणि चांगलं रहायला मदत होते.

देवराई आणि पाणी - 

बहुतेक देवरायांमधे पाण्याचा एक तरी स्त्रोत असतो. मग तो झरा असेल, विहीर असेल, तलाव असेल, ओढा असेल, नदी असेल, खरंतर मला तरी असंच वाटतं की देवराई संकल्पना ही पाण्यासाठीच तयार केली गेली असावी. उत्तम राखलेलं जंगल, त्यात लोकांचा फार कमी वावर आणि चांगल्या जंगलामुळे होणारे जलसंधारण आणि मृद्संधारण.
आजही सह्याद्री मधे अनेक गावांत अनेक देवराया अशा आहेत की गावातल्या विहिरी आटतात पण गावापेक्षा उंच असलेल्या देवराई मध्ये वर्षभर पाणी मिळतं. कित्येक ठिकाणी संपूर्ण गाव त्या एकाच स्त्रोतावर अवलंबून असतं.
कोकणात अनेक ठिकाणी देवरायांमध्ये असलेल्या स्त्रोताचे पाणी हे गावापर्यंत नेलेलं आढळतं. त्या गावातील लोकांना माहिती असते की जोपर्यंत देवराई आहे तोपर्यंत पाणी मिळणार आहे. त्यामुळे गाव देवराई संरक्षण जास्त काळजी घेऊन करतं. देवराई जर गावापेक्षा उंच ठिकाणी असेल आणि चांगली राखलेली असेल तर त्या गावातील विहिरी जास्त काळ पाणी देतात असाही अनुभव आहे.
सध्याची परिस्थिती - 
आता, एवढे सगळे फायदे असूनही देवराई पुढे कोणते धोके आहेत हा प्रश्न लगेच मनात येतो.

१. सध्या स्वार्थ आणि प्रगती याचा पाठलाग करताना धार्मिक भावना वगैरे गोष्टी कमी होत चालल्या आहेत. मोठ्ठं मंदिर, त्यापुढे बाग यासाठी देवरायांमध्ये असलेलं जंगल तुटायला लागलं आहे. सर्व परत समजावून सांगायची गरज निर्माण झाली आहे.
२. याव्यतिरिक्त, वेगाने होणारा विकास देवराई कमी व्हायला किंवा नष्ट व्हायला कारणीभूत होतोय.
३. खाणींमुळे होणारं नुकसान
४. शेत जमिनी आणि वाढत्या शहरांच अतिक्रमण यामुळे होणारं नुकसान 
देवराई संरक्षण कसं करता येईल? - 
देवराई या संकल्पनेमध्ये लोकसहभागातून रक्षण केलं जातं. ही पिढ्यान पिढ्या यशस्वीपणे चालत आलेली परंपरा आहे. त्यामुळे जैवविविधता संरक्षण आणि संवर्धन यासाठी या परंपरेचा उपयोग करून घेतला तर यश मिळण्याची जास्त शक्यता आहे.
देवराईच्या माध्यमातून जैवविविधता जपण्यासाठी या गोष्टी करता येतील -
१. स्वयंसेवी संस्थांच्या सहाय्याने संरक्षण
२. स्थानिक लोकांच्या सहाय्याने संरक्षण
३. देवराई भोवती देशी वनस्पती लागवड करून त्याचा वापर दैनंदिन वापरासाठी करणं
या सर्व प्रक्रियेमध्ये कळीचा मुद्दा आहे तो म्हणजे स्थानिक लोकसहभाग, आणि त्याच्या यशस्वी अंमलबजावणीवरच सर्व प्रयत्नांचं यश अवलंबून आहे. आपण निसर्गाचा एक भाग आहोत आणि आपण गरजेशिवाय सुद्धा नैसर्गिक साधन संपत्ती वापरत असतो, त्यामुळे आपल्यावर या सर्व गोष्टी टिकवण्याची जबाबदारी आहे हे लक्षात घेऊन आणि ठेवून माणसाने जैवविविधतेचं संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी प्रयत्न करत राहणं आवश्यक आहे.
या सर्व प्रयत्नांसाठी देवराई आपल्याला मार्गदर्शक म्हणून उपयोगी पडणार आहे.
    

डॉ. उमेश मुंडल्ये

फोटो क्रेडीट - डॉ. उमेश मुंडल्ये

आज जागतिक वन दिनाच्या निमित्ताने हा लेख एका वर्तमानपत्रासाठी लिहिला होता. परंतु, त्यांना बाकी बातम्यांमुळे जाएगा न मिळाल्याने तो परत घेऊन इथे टाकतोय.
पर्यावरण या गोष्टीकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन या उदाहरणातून सहज कळतो. 



                       

                

1 comment:

  1. अत्यंत माहितीपूर्ण आणि महत्वाचा लेख.

    ReplyDelete