Friday, 13 October 2017

विहीगाव जल संधारण प्रकल्प - दुसऱ्या पावसाळ्यानंतर

विहीगाव बंधारा (अशोक धबधबा)
दोन वर्षांपूर्वी विहीगाव मध्ये विवेकानंद सेवा मंडळ या संस्थेसाठी जल संधारण प्रकल्प सुचवण्यासाठी, तयार करण्यासाठी आणि प्रत्यक्ष कामासाठी काम केलं होतं. आज त्याच्या पुढच्या कामासाठी गावात सर्वेक्षणासाठी गेलो असताना या बंधाऱ्याला भेट दिली. वर आहे तो त्याचाच फोटो. अशोका चित्रपटात दाखवलेला हाच तो धबधबा. एवढं पाणी असूनही गावात उन्हाळ्यात पाणी टंचाई व्हायची. त्यावर उपाय म्हणून जी उपाययोजना केली गेली त्यातील एक भाग म्हणजे या बंधाऱ्याची दुरुस्ती आणि बळकटीकरण.

बाजूच्या फोटोत दिसतेय ती दोन वर्षांपूर्वीची अवस्था. गाळाने पूर्ण भरून गेलेला आणि भेगाळलेला बंधारा. सर्व बंधाऱ्यातून पाणी नीट पाझरून जायचं. याचं बळकटीकरण आणि दुरुस्ती करणं हा उपाययोजनेचा एक भाग होता.








बाजूच्या फोटोत आहे तो दुरुस्ती केल्यानंतर दोन वर्षांनी आज काढलेला फोटो. आज या बंधाऱ्यामध्ये जवळजवळ १,२०,००,००० लिटर पाणी आहे. साधारण ३०० मीटर पर्यंत हा पाणीसाठा विस्तारलेला आहे. या बंधाऱ्यातून काही पाणी अजूनही झिरपताना दिसतंय पण ते बंद करण्याची प्रक्रिया ठरली आहे. त्यामुळे ते बंद होईल. हा आणि याच्या प्रवाहाच्या वरच्या बाजूला असलेला एक बंधारा, हे दोन्ही मिळून आज गावात
साधारण दोन कोटी लिटर पाणी उपलब्ध आहे.

मात्र, हे पाणी फक्त साठणं हे काही या प्रकल्पाचं उद्दिष्ट नव्हतं आणि नाही. ही पहिली पायरी आहे. या पाण्याचा वापर करून गावातील तरुण शेतीतून जेव्हा पैसे मिळवतील तेव्हा हा प्रकल्प यशाकडे वाटचाल करतोय असं म्हणता येईल.
या कामासाठी भारत विकास परिषद, अनेक सुहृद आणि मित्रमंडळी यांचा मोलाचा सहभाग आणि आर्थिक मदत मिळाली म्हणून विवेकानंद सेवा मंडळ हा प्रकल्प वेळेत आणि यशस्वीपणे पूर्ण करू शकलं. आता जबाबदारी कार्यकर्ते आणि गावकरी तरुणांची आहे. सुरुवात तर झालीय, बघूया या वर्षी आणखी काय आनंद मिळतोय ते!

आत्ता शेअर केलीय ती एक आनंददायक आठवण! कामाच्या सफलतेची!
डॉ उमेश मुंडल्ये




Saturday, 13 May 2017

कोकणात जलसंधारण करताना घ्यायची काळजी 

कोकणात जलसंधारण करताना घ्यायची काळजी 

१. मुख्य नदीवर काम करण्याआधी उपनद्या, ओढे, झरे, इत्यादि स्त्रोतांवर काम करावं. 

२. गाळ काढण्याआधी, प्रवाहाच्या वरच्या भागात Gabion बंधारे (किमान २) बांधावेत. त्यामुळे पावसात लगेच परत गाळ येणार नाही. 

३. गाळ काढताना, स्रोताचा नैसर्गिक उतार कायम ठेवावा. त्यांत फेरफार करू नये. 

४. पाण्याच्या स्रोतावर काम करताना त्याच्या दोन्ही बाजूंचा उतार ४५ अंशांत ठेवावा. त्याने स्थिरता येते आणि बाजू ढासळून पडत नाहीत. 

५. कामाचं स्वरुप ठरवताना, आधी आजूबाजूचे उतार, भौगोलिक परिस्थिती, पाण्याच्या प्रवाहाचा वेग इत्यादि बाबींचा अभ्यास करून मगच गाळ किती काढायचा याबद्दल निर्णय घ्यावा. योग्य अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्यावा. 

६. शक्य होईल तेवढं स्थानिक सामान वापरावं. 

७. जर बंधारा बांधायचा निर्णय घेत असाल तर "समृद्ध कोकण" च्या त्या विषयातील अधिकारी व्यक्तीकडून आराखडा तयार करून घ्यावा. 

८. बंधाऱ्यांत गाळ साठू नये यासाठी त्यात पाइप (वेंट) ठेवावेत. 

९. आंधळेपणाने कोणाचीही नक्कल करू नये. तसं केल्यास त्याचा दुष्परिणाम होऊ शकतो. अनेकदा, तो पाण्याचा स्त्रोत उध्वस्त होऊन कायमस्वरूपी नुकसान होऊ शकतं. त्यामुळे काळजी घ्यावी.  

जलसंधारणाच्या यशस्वी कामासाठी मनापासून शुभेच्छा!

डॉ उमेश मुंडल्ये.  

9967054460

drumundlye@gmail.com 

Friday, 14 April 2017

Participatory Mandalvas watershed development

Mandalvas watershed development - Mandalvas bandh


Appropriate site selection, site specific structure and participation of villagers in the execution gives you great output.
One more experience, this time from Alwar district in Rajasthan. We were visiting different sites where Tarun Bharat Sangh has executed watershed development projects for years.
Mandalvas is a village situated at base of a small hill range, on a plateau. The hillas almost encircle the village. There are several small 'Johads" (earthen bunds forming water reservoirs) in & around the village. But, the one I am writing about is the largest bund in the area.
Villagers were facing water shortage & very few farmers were able to take two crops in the area. And due to lack of sufficient water, the yield was also not desirable.
With the expertise of Dr Rajendra Singh, active participation of "Tarun Bharat Sangh" and villagers, a large earthen bund was built in the area after proper site selection. It took about 5-6 years for villagers to build the reservoir step by step and the work is still going on. But, we can see the results now after 6 years.
The reservoir has now capacity of more than 30 crore liters. It has spread over a kilometer behind the bund, with maximum depth of 15 meters.
Earlier very few farmers were able to take crops. Now, all the villagers take crop. Wheat is now the principal crop in the village. The yield has gone about 500 times more compared to earlier yield.
Now, the villagers sell the crop & earn money out of it.
While we were on the bund wall, I asked my engineer friend who works in BMC, about the expected cost of the bund. He told it about 20 crore rupees as per the design, volume of work, etc. We asked the same question to the villagers who built the bund. And the answer was, " We have spent about 15 lakh rupees on this bund in last 6 years".
This bund has changed the fortune of Mandalvas village, and 5 more villages downstream. Now, villagers take crops liike wheat, vegetables and supplementary activities are dairy & goat farming.
This is power of "participatory conservation" & appropriate site & structure selection.

    

Monday, 27 March 2017

जल साक्षरता, नदी पुनरुज्जीवन आणि लोक सहभाग - काळाची गरज

जल साक्षरता, नदी पुनरुज्जीवन आणि लोक सहभाग - काळाची गरज

वालधुनी नदी परिक्रमा 

हा लेख लिहावा का? का लिहावा? यावर कालपासून खूप विचार करून शेवटी लिहायला घेतला. कारण अशा वस्तुस्थिती दाखवणाऱ्या लेखांची आवश्यकता आहे असं मनापासून वाटलं.
२६ मार्चला उल्हासनगर आणि डोंबिवली येथे वालधुनी नदी पुनरुज्जीवन मोहिमेची सुरुवात झाली. डॉ राजेंद्रसिंग, महाराष्ट्र नेचर पार्कचे अविनाश कुबल, इंस्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्सचे पदाधिकारी आणि सभासद, चांदीबाई कॉलेज, विविध संस्था, दहिसर नदी पुनरुज्जीवन समितीचे सदस्य आणि लोकांच्या सहभागातून सकाळी ८ वाजता नदीची परिक्रमा करून (उल्हासनगर भागातील) त्यानंतर चांदीबाई कॉलेज मधे एक सभा होऊन त्यात या नदीच्या पुनरुज्जीवनासाठी काय आणि कसे प्रयत्न करावेत या दृष्टीने काही मुद्द्यांवर चर्चा झाली.
संध्याकाळी डोंबिवली जिमखाना येथील सभागृहात या विषयावर वेगवेगळी प्रेझेंटेशन झाली. शेवट डॉ राजेंद्रसिंग यांच्या मनोगताने झाला.
या दोन्ही घटनांमधे जे अनुभवलं ते सर्वांना सांगावं हा या लेखाचा हेतू.
उल्हासनगरची लोकसंख्या काही लाखांत आहे. नदी प्रचंड प्रमाणात प्रदूषित आहे. कारखाने आणि निवासी विभागातील सांडपाणी सर्रास नदीत सोडलं जात आहे. नदीच्या पाण्याचा रंग, त्याला येणारी दुर्गंधी, हे सर्व त्या नदीवर जे अत्याचार केले जात आहेत ते स्पष्टपणे दाखवत आहेत. विविध सरकारी योजना तयार होऊन, त्यातून काही योजनांमधे खर्च होऊन गेलाय पण नदीची परिस्थिती आणखी वाईट होत चाललीय.
या सर्व पार्श्वभूमीवर पाणी क्षेत्रातील नोबेल समजले जाणारे स्टॉकहोम वॉटर प्राइज मिळालेले, जगावर चांगला परिणाम घडवणाऱ्या ५० लोकांमधे ज्यांचं नाव घेतलं जातं ते, ७ नदया यशस्वीपणे पुनरुज्जीवित करणारे डॉ राजेंद्रसिंग या कामात मदत करायला, सहभागी व्हायला येतात, तेव्हा त्यांच्यासमोर जेमतेम १०० माणसं असतात, आणि त्यातली ५० टक्के बाहेरगावातून आलेली असतात, स्थानिक लोक फारच कमी दिसतात, हे फारच धक्कादायक होतं. त्यातल्या त्यात जमेची बाब म्हणजे उल्हासनगरच्या २ नगरसेविका यात सहभागी झाल्या होत्या.
संध्याकाळी तर आणखी कठीण परिस्थिती होती. डोंबिवली जिमखाना मधल्या कार्यक्रमाला उपस्थिती जेमतेम ५०-६० लोकांची. त्यात नदीच्या पुनरुज्जीवनाबद्दल उपाय सुचवणारे कमी.
या कार्यक्रमाला असलेली उपस्थिती, लोकांची मानसिकता दाखवते. हा कार्यक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यात आयोजक कमी पडले किंवा अशा कार्यक्रमात रविवार संध्याकाळ वाया घालवावी असं लोकांना वाटलं असावं का असाही प्रश्न पडतोय.
पाणी, पर्यावरण, निसर्ग याकडे आपण कसं बघतोय याचं हे निदर्शक आहे. या कार्यक्रमाला माणूस जोगेश्वरीहून आला होता, म्हणजे इच्छा असेल तर हे शक्य आहे.
डॉ. राजेंद्रसिंगजी यांनी सांगितल्याप्रमाणे, "नदी, नीर और नारी का सम्मान ही समाज को प्रगती की तरफ ले जाता है", या विधानावर खूप गांभीर्याने काम करायची गरज आहे.
पाणी, पाण्याचे स्त्रोत, नदया, तलाव इत्यादि जीवनवाहिनी जपण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करायची गरज आहे. आपण आपल्या पुढच्या पिढीसाठी काय वातावरण तयार करून  ठेवतोय याचा किमान आता तरी विचार करून, आवश्यक कृती करायची वेळ आलीय.
काही लाखांची लोकवस्ती असलेल्या शहरात सुट्टीच्या दिवशी संध्याकाळी एवढया महत्वाच्या विषयावर मार्गदर्शन करायला एक अनुभवी मार्गदर्शक येतो आणि त्याची गंधवार्ताही सामान्य नागरिक, प्रतिष्ठित, स्वयंसेवी संस्था, पत्रकार यांना नसते किंवा त्याचं महत्व यापैकी कोणाला वाटत नाही हे माझ्या दृष्टीने खूप गंभीर आहे. आणि अशा वागण्याचे दुष्परिणाम आपण भोगत असतानाही आपल्या वागण्यात बेफिकीरी आहे, योग्य काम करायची इच्छा दिसत नाहीये, जाणीव दिसत नाहीये, यावरून भविष्यात काय वाढून ठेवलंय याचा अंदाज येतोय.
अजूनही वेळ पूर्णपणे गेली नाहीये. जागे व्हा. अशा सर्व प्रयत्नात सहभागी व्हा. आपण आत्ता काही योग्य उपाय केले तरच पुढच्या पिढीला काही चांगल्या गोष्टी शिल्लक राहतील.
आपण या जगाचे मालक नाही, मागच्या पिढीकडून पुढच्या पिढीकडे हा वारसा आपल्याला द्यायचाय की आहे ते आळस, दुर्लक्ष, बेफिकीरी यात संपवून सगळं भकास  करून टाकायचं हे नक्की करून त्याप्रमाणे प्रत्यक्ष काम करायची गरज आहे.



Monday, 20 March 2017

लोक सहभागातून पर्यावरण संवर्धनाचा सांस्कृतिक वारसा - देवराई

लोक सहभागातून पर्यावरण संवर्धनाचा सांस्कृतिक वारसा - देवराई
डॉ. उमेश मुंडल्ये  

वेगाने वाढणारी शहरं, औद्योगिकीकरण, लोकसंख्येचं ध्रुवीकरण, या आणि अशा अनेक गोष्टींमुळे निसर्गाचा समतोल ढळतोय आणि त्यामुळे पाणी, जंगलं, एकूणच जीवसृष्टीवर त्याचा खूप वाईट परिणाम होतोय. यात सर्वात वाईट भाग असा की या गोष्टीचं आकलन खूप कमी लोकांना दिसते आणि या गोष्टींवर प्रत्यक्ष काम करून योग्य प्रकारे संवर्धन आणि संरक्षण करणं हे तर फार दुर्मिळ आहे.
वाढती लोकसंख्या, शहरीकरण, आणि मानवकेंद्रित विकास यामुळे शेतीची जमीन, जंगलं कमी आणि विरळ होत चालली आहेत, पाण्याचे स्त्रोत, वृक्षसंपदा कमी होत चालली आहे. याचा गम्भीर परिणाम पर्यावरण आणि नैसर्गिक स्त्रोतांवर होतोय. 
शिल्लक असलेली जंगलं टिकवण्यासाठी आणि वाचवण्यासाठी सरकारी पातळीवर अनेक कायदे केले गेलेत आणि अजूनही केले जातायत. परन्तु, जैवविविधतेचे महत्त्व फार कमी लोकांपर्यंत पोहोचले आहे. आपण जीवसृष्टीच्या केंद्रस्थानी नसून केवळ एक भाग आहोत आणि फ़क्त आपणच निसर्गाचं शोषण करतोय (माणसा व्यतिरिक्त इतर कोणताही प्राणी निसर्गाचं शोषण करत नाही) त्यामुळे जैव विविधता आणि नैसर्गिक स्त्रोत यांचं संवर्धन आणि संरक्षण ही आपली जबाबदारी आहे हे ओळखून माणसाने कृती करायला हवी. त्यासाठी जाणीव जागृति करत राहण्याची गरज आहे. 
जरी सध्या अनेक लोक पर्यावरण संवर्धन आणि संरक्षण यासाठी काही उपाय सुचवत असले तरी त्यातले बरेचसे उपाय हे मानवाला केंद्रस्थानी मानून चाललेत. त्यामुळे योग्य परिणाम होत नाहीये. तात्पुरती मलमपट्टी करणं चालू आहे. बहुतेक ठिकाणी "संरक्षण दुसर्याने करावं, मी उपभोग घेईन" ही मनस्थिती दिसतेय.
सरकारी पातळीवर संरक्षणाचा भाग म्हणून विविध भाग संरक्षित करणं (अभयारण्य, National Parks, Biosphere Reserves, Gene Banks, वगैरे) आणि वेगवेगळे कायदे करणं हे दिसते. पण यात या सर्व प्रक्रियेतून माणूस बाजूला काढला जातो. त्यामुळे हे उपाय लोक सहभागाविना अयशस्वी होताना दिसतात. 
दुसरीकडे, शहरांची पाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी बांधली जाणारी धरणं, त्यामुळे होत असलेली मातीची धूप, शहरांचं बाजूच्या शेतजमिनीवर होत असलेलं आक्रमण, त्यामुळे जंगलं तोडून केली जाणारी शेती, वैध, अवैध खाणी, जंगलांमधून गोळा केलं जाणारं वनोपज, अवैध आणि बेलगाम चराई या गोष्टींमुळे वन संवर्धन आणि संरक्षण करण्याच्या प्रयत्नांना खीळ बसते. त्यातच जंगलं कमी झाल्याने वन्य प्राण्यांनी जवळच्या मानवी वस्तीवर अन्नासाठी हल्ले करणं, त्यात मनुष्य हानी होणं, त्यामुळे, लोकांनी वन्य प्राण्यांना मारणं, इत्यादि गोष्टी होतात. त्यामुळे सर्व संरक्षण आणि संवर्धन प्रक्रिया वादात सांपडते. या प्रकारांमुळे साधी जंगलं तर जाऊ देत, संरक्षित जंगलांचं संरक्षण कठीण गोष्ट झालीय. 
यातच भर म्हणून कि काय, मिश्रवनं निरुपयोगी समजून ती तोडून तिथे पैसे देणाऱ्या झाडांची लागवड केली जातेय आणि सरकार विविध सवलती आणि योजनांद्वारे त्याला पाठिंबा देत आहे. यात पर्यावरण संतुलन कुठेच विचारात घेतलं जात नाहीये. त्यामुळे ही विविधता आणखी कमी होत चाललीय.     
सुदैवाने, लोक सहभागातून जीव विविधतेच संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी भारताला परंपरेने एक सुदृढ आणि पुरातन वारसा दिला आहे. एखादी गोष्ट जर दीर्घकाळ यशस्वीपणे चालू ठेवायची असेल तर ती लोकांच्या जगण्याचा एक भाग झाली पाहिजे या गोष्टीची जाण आपल्या शहाण्या पूर्वजांना असावी. त्यांनी निसर्गातील अनेक घटक देव किंवा देवाचे प्रिय घटक मानून त्यांचं संरक्षण करण्याची प्रथा वेगवेगळ्या कारणांनी चालू केली. यात नद्या, तलाव, विविध डोंगर शिखरं, विविध वनस्पती आणि प्राणी, इत्यादि गोष्टींना धार्मिक महत्त्व देऊन त्यांचं संरक्षण आणि संवर्धन पिढ्यानपिढ्या केलं. यातला एक आणि सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे "देवराई". 
देवराई म्हणजे देवाच्या नावाने राखून ठेवलेलं जंगल. हे जंगल देवाला अर्पण केलेलं असल्याने याची तोडकेली जात नाही. या जंगलातील सर्व गोष्टी धार्मिक भावनेने पिढ्यानपिढ्या सांभाळल्या जातात. हे देवाचे जंगल आहे त्यामुळे यातील कोणत्याही गोष्टीचा वापर व्यापारासाठी करायचा नाही, कोणतंही झाड तोडायचं नाही या ठाम भावनेने या देवरायांच संरक्षण केलं जातं. देवराईला कुंपण किंवा संरक्षक भिंत नसते, कोणी राखणदार नसतात, पण तरीही केवळ धार्मिक भावनेने या जंगलांच रक्षण केलं जातं. सामाजिक बंधन हा सर्वात जास्त परिणामकारक ठरणारा घटक आहे. 

देवराई कशी दिसते - 
एखाद्या परिसरात फिरताना उजाड परिसरात किंवा शेतांमध्ये अचानक चांगला जंगलाचा राखलेला भाग दिसला कि ज्यात शिरणं कठीण आहे किंवा जो एकदम वेगळा दिसतोय किंवा एखादं उत्तम दर्जाचं जंगल आहे, समजावं कि ही देवराई आहे.
देवराई नुसती फोटो बघून किंवा वर्णन वाचून कळत नाही, प्रत्यक्ष अनुभवण्याची आहे. कोणत्याही चांगल्या देवराईत शिरल्यावर आपला बाकी जगाशी संपर्क जवळपास तुटतो. आतलं आणि बाहेरचं तापमान, आर्द्रता यात जाणवण्याएवढा फरक अनुभवायला मिळतो. आत शिरल्यावर आपल्याला दिसतात ते उंचच उंच वृक्ष, त्यावर असणार्या अनेक आकाराच्या वेली, गच्च झाडोरा आणि विविध पक्षी, प्राणी यांचे आवाज आणि बरेचदा दर्शन. कुठे तरी वाहणार्या ओढ्याचा किंवा नदीच्या पाण्याचा आवाज, पक्ष्यांचा किलबिलाट, माकडं, भेकरं, पिसोरी, मोर, ककणेर, घुबड, दयाळ, नंदन नाचण, राजगिधाड, अशा अनेक पशुपक्ष्यांच दर्शन होतं. काही देवरायांमधे तर शेकरू आणि तिची घरटी दिसू शकतात. घाटमाथ्यावरच्या देवराईमधे अनेकदा सर्पगरुड़ पहायला मिळतो.  
देवराईच्या मध्यावर किंवा एका बाजूला एखादं मंदिर असतं. निसर्गातूनच आलेला देव किंवा देवी असते. ती त्या देवराईची आणि गावाची राखण करते. एखादा झरा किंवा ओढा असतो. क्वचित एखादी नदी उगम पावते. अनेक दुर्मिळ झाडं दिसतात. एकून वातावरण एकदम वेगळंच असतं, कोणीही भारावून जावं, शांत व्हावं अशी किमया हे देवराई मधलं वातावरण घडवून आणतं.


देवराई कुठे आढळते? - 

सर्वसाधारणपणे, देवराई गावाच्या सीमेवर आढळते. पण याचा अर्थ ऐसा नाही की देवराई एखाद्या विशिष्ट ठिकाणीच आढळते. देवराई गावात असू शकते, गावाच्या सीमेवर असू शकते, गावापासून लांब असू शकते, जंगल आणि गाव याच्यामध्ये असू शकते. अनेक ठिकाणी तर एकाच गावाच्या प्रत्येक वाडीत एक याप्रमाणे देवराया दिसून येतात. ही सार्वजनिक जंगलं आहेत. बहुतांश देवरायांमधे पाण्याचा एक तरी स्त्रोत असतो.
महाराष्ट्राचा विचार केला तर देवराया पश्चिम घाटाच्या आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळतात. तसंच सातपुडा डोंगर रांगा, यवतमाळ, नांदेड़ जवळील आदिवासी भाग, भंडारा, गड़चिरोली, वगैरे भाग जिथे आदिवासी वस्ती आहे त्या भागात देवराया आढळतात. मराठवाडा आणि पश्चिम विदर्भ या भागात देवरायांची संकल्पना आढळत नाही किंवा त्याबद्दल काही नोंद नाहीये.
आजपर्यंत मी केलेल्या संशोधनात ३७८३ देवारायांची नोंद केली आहे.  मुंबई मध्ये तर एक देवराई समुद्रामधल्या बेटावर आहे. तिथे ओहोटीच्या वेळेला चालत जाता येतं. या देवराईत गोड्या पाण्यातील झाडं दिसतात.  
देवराई किती आकाराची असावी याचा काही नियम नाहीये. कधी ती एका झाडाची असते (खरंतर एक मुख्य वृक्ष आणि त्यावर असंख्य वेली असं चित्र दिसतं). किंवा कधी ती १०० एकरापेक्षा मोठी असते. पण, सर्वसाधारणपणे देवराई १० गुंठे ते १० एकर एवढ्या परिसरात पसरलेली आढळते. बरेचदा, गावाच्या मध्ये असणारी किंवा सीमेवर आढळणारी देवराई लहान असते पण हा नियम नाहीये.  देवराईचं महत्त्व हे तिच्या आकारमानापेक्षा त्यात मिळणार्या प्रजातींवर अवलंबून असतं. मला दिसलेली सर्वात मोठी देवराई २०० एकरपेक्षा मोठी आहे. 
देवराई मधील देव - 
देवराई मध्ये असणारे देव हे बरेचदा निसर्गातून आलेले देव असतात. उदा. वाघजाई, काळकाई, शंकर, भैरी, वगैरे. अनेक देवरायांमध्ये हे देव उघड्या आभाळाखाली किंवा एखाद्या झाडाच्या खाली, पण उघड्यावर, असतात. देवराई मधल्या कोणत्याही गोष्टीची तोड झाली तर हे देव त्या दोषी माणसाला आणि त्याच्या वंशाला शिक्षा देतात अशी त्या गावातल्या लोकांची श्रद्धा असते आणि त्या श्रद्धेच्या आधारेच या देवराईचं रक्षण केलं जातं. अनेक देवरायांमध्ये तर देवाऐवजी भूत राखणदार असल्याचं बघायला मिळालं. 
जसजशी सुधारणा होत गेली किंवा शहरातल्या लोकांचा प्रभाव पडला किंवा राजकीय सत्तेचा किंवा अन्य धर्मीय सत्तेचा प्रभाव पडला तिथे तो या मंदिरांवरही दिसतो. पण एक गोष्ट नक्की, कि ही संकल्पना शेकडो वर्षांच्या परकीय आणि परधर्मीय सत्तेतही टिकून कायम राहिली. 
देवराई मधील जैवविविधता - 
देवराई तिथल्या घनदाट जंगलासाठी प्रसिद्ध आहेच पण ती तिथल्या जैवविविधतेसाठी जास्त प्रसिद्ध आहे. हे एक उत्तम दर्जाचं जंगल असतं, देवराई मध्ये त्या परिसरातील मूळ जंगलातील टिकून राहिलेली वन संपदा असते. कंदमुळे, गवताच्या अनेक जाती, जमिनीवर पसरणार्या वनस्पती, लहान मोठी झुडुपे, लहान मोठी झाडे, खूप उंच वृक्ष, त्यावर वाढणार्या वेली आणि इतर वनस्पती, शेकडो प्रकारचे पक्षी, वनस्पती, कीटक, फुलपाखरे, शेवाळे, बुरशी, जंगली प्राणी इत्यादि जीव सृष्टी देवराई अधिक समृद्ध करतात. अनेक प्रकारच्या दुर्मिळ वनस्पती, प्राणी, पक्षी, कीटक देवराईत सुरक्षित वातावरणात मोठ्या संख्येने आढळतात. 
आत्तापर्यंत मी केलेल्या संशोधनात वनस्पतींच्या सुमारे १४५० हून जास्त प्रजाती नोंदण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे, सुमारे १४० प्रकारचे  पक्षी, ८० हून जास्त प्रकारची फुलपाखरे, १८ हून जास्त प्रकारचे सरपटणारे प्राणी, भेकरे, पिसोरी, हरणे, साळींदर, खवले मांजर, माकडे, नीलगाय, गवा, रान मांजर, बिबट्या, इत्यादि वनजीवन सुरक्षितपणे जगताना दिसते.      
 देवराई मधील औषधी वनस्पती - 

देवराई तिथल्या औषधी वनस्पतीच्या भांडारासाठी प्रसिद्ध आहे. बाहेरच्या भागात दुर्मिळ असणारी झाडं इथे चांगल्या दर्जाची आणि मोठ्या प्रमाणावर आढळतात. गावातील जाणकार त्याचा वापर पैसे न घेता करतात. अनेक देवरायांमध्ये हल्ली झाड न तोडता बाकी गोष्टी वापरल्या जातात. 
इथे हिरडा, बेहेडा, आवळा, सर्पगंधा, गुळवेल, कावळी, धायटी, मुरुडशेंग, बकुळ, खैर, अमृता, अशोक, चित्रक, गेळा, गारबी, उक्षी, वाळा, कडू कवठ, रामेठा, पळसवेल, मोह, कुंभा, शिकेकाई, रिठा, इत्यादि शेकडो प्रकारच्या प्रजाती मिळतात.
एक गोष्ट नक्की की देवराई मधील कोणत्याही गोष्टीचा व्यावसायिक वापर करायला बंदी असते.
देवराई आणि गाव - 
देवराई हे गावाचं सांस्कृतिक केंद्र असतं. गावाचे सर्व उत्सव सार्वजनिकरित्या देवराई मध्ये साजरे केले जातात. अनेक गावांमध्ये मासिक ग्राम बैठक देवराई मध्ये घेतली जाते आणि त्यात गावाच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय सामुहिकपणे घेतले जातात. गावातील शाळा आणि मंदिराची दुरुस्ती या २ गोष्टींसाठीच देवराई मधील एखाद दुसरे झाड तोडायला ग्रामसभा क्वचित परवानगी देते. अन्यथा, झाड तोडणार्या व्यक्तीला दंड भरावा लागतो. एकूणच, गाव देवराई उत्तम रित्या जपतं.
काही ठिकाणी काही विशेष नियम असतात, उदा. तुम्ही देवराई मध्ये कोयता घेऊन जाऊ शकता पण कुर्हाड न्यायला बंदी आहे. याचं कारण सोपं आहे, कोयत्याने वाळलेल्या फांद्या तोडता येतात, कुर्हाड वापरून झाड तोड़ता येतं. किंवा, काही देवरायांमध्ये अनवाणी जायचं बंधन आहे. हे अजुन एक सोपा उपाय आहे लोकांना लांब ठेवायचा. कारण तुम्ही जंगलात फार काळ आणि अंतर अनवाणी जाऊ शकत नाही.
कारणाशिवाय त्या भागात जायचच नाही अशी योजना यामागे दिसून येते. त्यामुळे, जंगल दाट आणि चांगलं रहायला मदत होते.

देवराई आणि पाणी - 

बहुतेक देवरायांमधे पाण्याचा एक तरी स्त्रोत असतो. मग तो झरा असेल, विहीर असेल, तलाव असेल, ओढा असेल, नदी असेल, खरंतर मला तरी असंच वाटतं की देवराई संकल्पना ही पाण्यासाठीच तयार केली गेली असावी. उत्तम राखलेलं जंगल, त्यात लोकांचा फार कमी वावर आणि चांगल्या जंगलामुळे होणारे जलसंधारण आणि मृद्संधारण.
आजही सह्याद्री मधे अनेक गावांत अनेक देवराया अशा आहेत की गावातल्या विहिरी आटतात पण गावापेक्षा उंच असलेल्या देवराई मध्ये वर्षभर पाणी मिळतं. कित्येक ठिकाणी संपूर्ण गाव त्या एकाच स्त्रोतावर अवलंबून असतं.
कोकणात अनेक ठिकाणी देवरायांमध्ये असलेल्या स्त्रोताचे पाणी हे गावापर्यंत नेलेलं आढळतं. त्या गावातील लोकांना माहिती असते की जोपर्यंत देवराई आहे तोपर्यंत पाणी मिळणार आहे. त्यामुळे गाव देवराई संरक्षण जास्त काळजी घेऊन करतं. देवराई जर गावापेक्षा उंच ठिकाणी असेल आणि चांगली राखलेली असेल तर त्या गावातील विहिरी जास्त काळ पाणी देतात असाही अनुभव आहे.
सध्याची परिस्थिती - 
आता, एवढे सगळे फायदे असूनही देवराई पुढे कोणते धोके आहेत हा प्रश्न लगेच मनात येतो.

१. सध्या स्वार्थ आणि प्रगती याचा पाठलाग करताना धार्मिक भावना वगैरे गोष्टी कमी होत चालल्या आहेत. मोठ्ठं मंदिर, त्यापुढे बाग यासाठी देवरायांमध्ये असलेलं जंगल तुटायला लागलं आहे. सर्व परत समजावून सांगायची गरज निर्माण झाली आहे.
२. याव्यतिरिक्त, वेगाने होणारा विकास देवराई कमी व्हायला किंवा नष्ट व्हायला कारणीभूत होतोय.
३. खाणींमुळे होणारं नुकसान
४. शेत जमिनी आणि वाढत्या शहरांच अतिक्रमण यामुळे होणारं नुकसान 
देवराई संरक्षण कसं करता येईल? - 
देवराई या संकल्पनेमध्ये लोकसहभागातून रक्षण केलं जातं. ही पिढ्यान पिढ्या यशस्वीपणे चालत आलेली परंपरा आहे. त्यामुळे जैवविविधता संरक्षण आणि संवर्धन यासाठी या परंपरेचा उपयोग करून घेतला तर यश मिळण्याची जास्त शक्यता आहे.
देवराईच्या माध्यमातून जैवविविधता जपण्यासाठी या गोष्टी करता येतील -
१. स्वयंसेवी संस्थांच्या सहाय्याने संरक्षण
२. स्थानिक लोकांच्या सहाय्याने संरक्षण
३. देवराई भोवती देशी वनस्पती लागवड करून त्याचा वापर दैनंदिन वापरासाठी करणं
या सर्व प्रक्रियेमध्ये कळीचा मुद्दा आहे तो म्हणजे स्थानिक लोकसहभाग, आणि त्याच्या यशस्वी अंमलबजावणीवरच सर्व प्रयत्नांचं यश अवलंबून आहे. आपण निसर्गाचा एक भाग आहोत आणि आपण गरजेशिवाय सुद्धा नैसर्गिक साधन संपत्ती वापरत असतो, त्यामुळे आपल्यावर या सर्व गोष्टी टिकवण्याची जबाबदारी आहे हे लक्षात घेऊन आणि ठेवून माणसाने जैवविविधतेचं संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी प्रयत्न करत राहणं आवश्यक आहे.
या सर्व प्रयत्नांसाठी देवराई आपल्याला मार्गदर्शक म्हणून उपयोगी पडणार आहे.
    

डॉ. उमेश मुंडल्ये

फोटो क्रेडीट - डॉ. उमेश मुंडल्ये

आज जागतिक वन दिनाच्या निमित्ताने हा लेख एका वर्तमानपत्रासाठी लिहिला होता. परंतु, त्यांना बाकी बातम्यांमुळे जाएगा न मिळाल्याने तो परत घेऊन इथे टाकतोय.
पर्यावरण या गोष्टीकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन या उदाहरणातून सहज कळतो. 



                       

                

Thursday, 2 March 2017

सरकारी पातळीवरील ठोकळेबाज उपाय - उपाय की अपाय?

सरकारी पातळीवरील ठोकळेबाज उपाय  - उपाय की अपाय?

४ दिवसांपूर्वी एका पार्लेश्वर रोटरी क्लब बरोबर शहापूर तालुक्यातील माळ नावाच्या गावात गेलो होतो. गावाला पाण्याची टंचाई आहे आणि ३ महिने पाण्यासाठी वणवण करावी लागते. गाव उंच पठारावर आहे आणि सर्व बाजूंनी उतार असल्याने पाणी वाहून जाते आणि टंचाई निर्माण होते अशी परिस्थिती आहे. गेली २ वर्षं हा प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही पार्लेश्वर रोटरी क्लब बरोबर प्रयत्न करात आहोत. यावर्षी बांधकाम करून पाणी साठवणं आणि जमिनीत मुरवणं यासाठी काम चालू करायच्या तयारीने गेलो असताना धक्कादायक प्रकार दिसला. तो लोकांपुढे यावा आणि अशा प्रकारामुळे होणारं नुकसान लोकांपुढे यावं म्हणून हा लेखप्रपंच. 
माळ गावात एक विहीर आहे जी मार्च मधे कोरडी होते. त्यानंतर गावकरी साधारण ८०० मीटर अंतरावर  असलेल्या बंधाऱ्याकडे जातात पाण्यासाठी. तिथे गुरं येतात, कपडे धुतले जातात, भांडी घनसाली जातात. त्यामुळे पाणी लवकर खराब होतं. सुदैवाने, तिथे एक जवळजवळ बारमाही झरा आहे, ज्याचं पाणी पिण्यासाठी वापरता येतं. बंधारा १२-१३ वर्षं जुना आहे. खूप गळती आहे, भिंत फुटली आहे, गाळ साठलाय, त्यामुळे पाणी जास्त काळ टिकत नाही आणि दर्जा वाईट असतो. त्यातून गावात आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात. 
अभ्यास करून एक योजना तयार करून आम्ही कामाला लागलो. या योजनेत विहिरीची दुरुस्ती करणं, विहिरीच्या खालच्या पातळीवर भूमिगत बंधारा बांधणें, जुन्या बंधाऱ्यातील गाळ काढणे, झऱ्यासमोर कुंड बांधून त्याचं आयुष्य २ महिन्यांनी वाढवणे आणि एक नविन बंधारा बांधणे, या गोष्टी आहेत. 
आत्ता गावात गेलो तेव्हा पाहिलं की जुन्या बंधाऱ्याच्या जवळ जिल्हा परिषदेच्या माध्यमातून नविन विहिरीचं काम अचानक सुरु झालंय आणि ते कंत्राटदाराच्या माध्यमातून सुरु आहे. अत्यंत चुकीच्या जागी २२ फूट व्यासाची आणि ३० फूट खोलीची विहीर करायचा प्रयत्न आहे. सध्या फ़क्त ५ फुट खोल खणून झालंय आणि दगड लागला आहे म्हणून काम थांबलंय. 
गावकऱ्यांमधे चर्चा होती की आता सुरुंग लावून, दगड फोडून ३० फुट खोल जाणार कारण तसं कॉन्ट्रैक्ट मधे ठरलंय. हे ऐकून मला प्रचंड धक्का बसला. यात अनेक धोके आहेत. 
१. विहीर चुकीच्या जागी, उतारात, झरे नसलेल्या जागी होतेय, त्यामुळे खर्च वाया जाणार 
२. सुरुंग लावून विहीर खोल करून उपयोग नाही कारण झरे नसल्याने ती पाण्याची टाकी होणार
३. जुना कमकुवत बंधारा जेमतेम १५० मीटर वर आहे. सुरुंग लावले की त्या धक्क्याने बंधाऱ्याला धोका पोहोचू शकतो आणि सध्याची परिस्थिति पाहता तो पडण्याचीच शक्यता जास्त आहे 
४. या उद्योगामुळे आहे ते पाणी वाहून जाण्याची भीती आहे 
५. गावकऱ्यांना एवढाच पाण्याचा स्त्रोत असल्याने ऐन उन्हाळ्यात पाण्याची परिस्थिती बिकट होणार आहे 
६. सरकारी पैसा, माणसांचे श्रम वाया जाणार आहेत 
७. यानंतर तिथे कोणतंही पाण्याचं काम होऊ शकणार नाही 
दुर्दैवाने, हे ना लोकांना कळतंय, ना कॉन्ट्रक्टरला, ना सरकारी पातळीवर काही विचार दिसतोय. सर्व संबन्धित लोकांना ही माहिती दिलीय पण अजुन काही प्रतिसाद नाहीये. 
एकीकडे स्वयंसेवी संस्था आणि देणगीदार याच्या मदतीने पाणी प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न चालु आहेत आणि दुसरीकडे सरकारी पातळीवरील अनास्था आणि स्थानिक परिस्थितीचा अभ्यास न करता टारगेट पूर्ण करण्यासाठी केली जाणारी कामं, यामुळे खूप प्रतिकूल वातावरण तयार होतंय. 
स्थानिक भौगोलिक परिस्थिती, लोकांची गरज, व्यवहार्य योजना यावर योग्य माणसांचा सल्ला घेऊन काम केलं तर अशी विचित्र परिस्थिती निर्माण होणार नाही हे लक्षात घ्यायची आवश्यकता आहे.  
  
    
  

Tuesday, 21 February 2017

योग्य उपाय आणि लोकसहभाग - यशाची गुरुकिल्ली

योग्य उपाय आणि लोकसहभाग - यशाची गुरुकिल्ली 

लोकसहभाग आणि योग्य उपाय किती बदल निर्माण करू शकतात आणि यश मिळणं कसं सोपं होतं हे सांगण्यासाठी ही पोस्ट. 
मागच्या आठवड्यात जनकल्याण समितीसाठी जव्हार आणि मोखाडा भागात होतो. लोकसहभागातून जलसंधारण करण्यासाठी पहिला टप्पा म्हणून ११ गावांचं सर्वेक्षण केलं, पाण्याचे स्त्रोत आणि टंचाई याबद्दल माहिती घेतली, ग्रामसभा घेतल्या. हे करत असताना वाटेत आम्ही २००९ साली काम केलेल्या "इखरीचा पाडा" नावाच्या एका गावात परत ८ वर्षानंतर जाण्याचा अचानक योग आला. 
२००९ मधे त्या गावात एकच विहीर होती आणि एकूण ६ गावांतले लोक फक्त त्या विहिरीवर अवलंबून होते. आणि अडचण ही होती की ती विहीर फेब्रुवारी महिनाअखेर आटून जायची. त्यानंतर, संपूर्ण उन्हाळा, अगदी पाऊस सुरु होईपर्यंत, लोक टँकर वर अवलंबून असायचे, पण तो ४ दिवसांनी एकदा यायचा. ते पाणी विहिरीत ओतलं जायचं आणि मग लोक ते काढून वापरायचे. यात पाणी वाया जाण्याचं प्रमाण खूप होतं. लोकांमधे मारामाऱ्या व्हायच्या, मुलांचं शिक्षण बंद व्हायचं, आरोग्याची वाट लागायची, स्थलांतर खूप व्हायचं. एकुण काय, तर गावाचं चित्र पर वाईट होऊन जायचं. आणि हे वर्षानुवर्ष चालू होतं. लोकांचा सरकार, संस्था, एकूणच माणुसकी यावरचा विश्वास आणि आत्मविश्वास उडाला होता. सगळीकडे नकारात्मक वातावरण होतं. 

आरोहन नावाची एक संस्था तिथे काम करत होती. रोटरी संघटनेच्या आर्थिक मदतीच्या सहाय्याने आणि माझ्या तांत्रिक मदतीने २००९ साली आम्ही तिथे २ झर्यांवर काम केलं आणि योग्य जागा निवडून एक भूमिगत बंधारा बांधला.   
आज ८ वर्षानंतर तिथे गेल्यावर एकूण वातावरण, पाण्याची मुबलक उपलब्धता, त्यामुळे लोकांमधे झालेला सकारात्मक बदल हे बघून खूप समाधान आणि आनंद मिळाला. भागातला भूमिगत जलस्तर उंचावला. जी विहीर पूर्वी फेब्रुवारी अखेर कोरडी व्हायची, ती गेल्या ८ वर्षात एकदाही कोरडी 
आम्ही केलेल्या योजनेमुळे पाण्याचे स्त्रोत मजबूत झाले आणि त्या णी सुरक्षितपणे वर्षभर मिळतं आहे. 
यात आर्थिक मदत रोटरी ने केली असली तरी बाकी काम
लोकसहभागातून केलं गेलं. आणि त्यामुळे, या कामांची जपणूक गावकरी प्रेमाने करतात. गावाचा शाश्वत विकास होतोय. 
आता गावकरी आजूबाजूच्या गावांतल्या लोकांना जल संधारण कामं करण्यासाठी प्रोत्साहित करायचं काम करत आहेत हे खूप महत्त्वाचं आहे. आत्ता आमच्या सर्वेक्षणाचं काम ५ गावांमधे सोपं झालं त्यामुळे. या भागात घडणारा हा बदल खूप समाधान आणि उत्साह देणारा आहे.       झाली नाहीये. ६ गावांतले लोक पाणी भरायला येऊनही विहिरीला वर्षभर पाणी असतं. 

गावातल्या लोकांनी पाणी मिळाल्यावर विटा पाडून आपली घरं पक्की करून घेतली, गावातले रस्ते चांगले करून घेतले, गावातला तलाव खोल करून त्यात मासे सोडले आणि त्यापासून पैसे मिळवायला सुरुवात केली.  सर्वात महत्त्वाचं, पाण्यासाठी मारामाऱ्या नाहीत, अपघात नाहीत, मनुष्यहानी नाही, आणि पुरेसं पाणी सुरक्षितपणे वर्षभर मिळतं आहे. 
यात आर्थिक मदत रोटरी ने केली असली तरी बाकी काम लोकसहभागातून केलं गेलं. आणि त्यामुळे, या कामांची जपणूक गावकरी प्रेमाने करतात. गावाचा शाश्वत विकास होतोय. 
आता गावकरी आजूबाजूच्या गावांतल्या लोकांना जल संधारण कामं करण्यासाठी प्रोत्साहित करायचं काम करत आहेत हे खूप महत्त्वाचं आहे. आत्ता आमच्या सर्वेक्षणाचं काम ५ गावांमधे सोपं झालं त्यामुळे. या भागात घडणारा हा बदल खूप समाधान आणि उत्साह देणारा आहे.



Tuesday, 3 January 2017

स्वागत २०१७ 

नवीन वर्षाची याहून अधिक सकारात्मक सुरुवात होणं अवघडच आहे. कोकण भूमी प्रतिष्ठान या संस्थेच्या पुढाकाराने कोकणात ४ नद्यांचं पुनरुज्जीवन करण्यासाठी लोकसहभागातून प्रयत्न चालू आहेत. त्याच्या प्रत्यक्ष कामाची सुरुवात नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी झाली.
जिथे कोणत्याही मोबाइल फोनची रेंज येत नाही अशा सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या ३ गावांत २००० च्या आसपास लोक दिवसभर श्रमदान करण्यासाठी हजर होते. वासिष्ठी आणि जगबुडी या दोन नदया आणि त्यांच्या उपनद्या यांवर लोकसहभागातून आणि योग्य सल्ल्याने काम करून या नदया परत बारमाही करण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. या सर्व मोहिमेचा एक भाग होण्याची संधी मला मिळाली आणि मी या योजनेशी जोडला गेलो.
त्या दिवशी या कामाची सुरुवात जलपुरुष म्हणून ओळखले जाणारे स्टॉकहोम पुरस्काराने सन्मानित (पाण्याच्या क्षेत्रातील नोबेल प्राइज) श्री राजेंद्रसिंगजी, कोकणातील ४ जिल्ह्यांचे आयुक्त श्री प्रभाकर देशमुख, रत्नागिरीचे जिल्हाधिकारी श्री प्रवीण प्रभाकर, सीओ श्री लक्ष्मीनारायण मिश्रा, कोकण ग्रीन चे मनोहर सकपाळ, या सर्व लोकांना, सर्व गावकऱ्यांना, मुंबईतून आलेल्या १५० हून अधिक लोकांना, मी आणि माझे मित्र श्री संदीप अध्यापक यांना, अशा सर्वांना एकत्र आणणारे आणि स्वतः पुढे राहून काम करणारे श्री संजय यादवराव, या सर्वांच्या उपस्थितीत झाली.
सकाळी चालू झालेला हा कार्यक्रम रात्री ९ वाजेपर्यंत चालला. साधारण २ हजार लोक यात सहभागी झाले होते.
मुंबई आणि रत्नागिरीतून आलेले ओमकार गिरकर, शिवलकर आणि मित्रमंडळी यांच्यासारखे तरुण कार्यकर्ते त्यांचं कौशल्य कसं वापरता येईल याचाही प्रत्यक्ष अनुभव घेऊन बघत होते.
या दोन्ही नदया, त्यांच्या उपनद्या यांवर site specific लहान लहान कामं करून हे नैसर्गिक स्त्रोत बारमाही कसे करता येतील यावर काम सुरु झालंय.
यात अनेक इकांडे शिलेदार भेटले. एका तरुणाने आपली नोकरी सुटल्यावर (कंपनी बंद झाल्याने) गावी येऊन लोकांना एकत्र करून पाणी आणि सामूहिक शेती करायला सुरुवात केलीय. एक मुलगी पुण्याला नर्स म्हणून काम करते, ती सुट्टीत गावी येऊन झाडं लावते. तिने एकटीने आजपर्यंत ५५०० झाडं लावून जगवली आहेत. असे अनेक अनाम शिलेदार या कामाच्या निमित्ताने बघायला मिळाले. आणि लक्षात आलं की फेसबुक किंवा सोशल मीडिया वरचं वातावरण, विषय, वाद, इत्यादि, त्यातलं कोणतंही माध्यम बहुसंख्य लोकांना उपलब्ध नसताना ते करत असलेलं काम यात कुठेच  नाहीये. कदाचित हा प्राथमिकतेचा आणि "माझे प्रश्न मीच सोडवायचा प्रयत्न करेन" या मानसिकतेचा फरक असावा. पण मला हा फरक आवडला.
लोकसहभाग इतका चांगला आहे म्हटल्यावर सरकारी यंत्रणा पण मदतीला आली. मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घातलं आणि मग कोकण आयुक्त, जिल्हाधिकारी, प्रान्त, मुख्याधिकारी, तहसीलदार, इत्यादि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी स्वतः दिवसभर उपस्थित राहून आपला सहभाग दाखवून दिला. १ जानेवारी आणि रविवार असूनही हे सर्व अधिकारी दिवसभर या सर्व ठिकाणी श्रमदानासाठी हजर होते ही माझ्या दृष्टीने आनंदाची गोष्ट आहे. समाज आणि शासन एकत्र असतील तर मोठी कामं सहज होतात हे खरंच!
 इतर कोणत्याही भागातील कामाचं अंधानुकरण न करता, योग्य जागी, योग्य पद्धतीने, योग्य काम केलं आणि एकच मोठं बांधकाम करण्या ऐवजी अनेक छोटी कामं योग्य अंतरावर योग्य जागा निवडून केली तर हे शक्य आहे. त्या दृष्टीने आम्ही काही जागा निवडून तिथे योग्य कामं सुचवली आहेत. काही लोकांनी पूर्वानुभवावरून निवडली आहेत. तिथे योग्य प्रकार कामं केली तर येत्या ४-५ वर्षांत नक्की चांगला फरक दिसून येईल.
राजेंद्रसिंगजी यांनी सांगितल्याप्रमाणे, "नीर, नारी और नदी इनका सम्मान ही समाज को प्रगती की ओर ले जाता है", हे लक्षात ठेवून काम केलं तर बारमाही नदया आणि शाश्वत विकास सहजशक्य आहे.
हे वर्ष अशाच चांगल्या अनुभवांचं जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना!

डोंबिवली - एक प्रवास भाग ४

डोंबिवली - एक प्रवास भाग ४ 
कोणत्याही गावाचा किंवा शहराचा विकास होताना अनेक प्रश्न निर्माण होत असतातच. त्या गावातील राजकीय, सामाजिक, प्रशासकीय, सांस्कृतिक नेतृत्व कसं आहे, त्यांचं या प्रश्नांबद्दलचं आकलन काय, लोकांचा त्यांच्यावर किती विश्वास आहे, त्यांचे हेतू काय, प्राथमिकता कशाला आहे, प्रत्यक्ष कृती करण्याची इच्छा किती, इत्यादि बाबींवर त्या गावाचा विकास कसा, कधी आणि किती होणार ते ठरत असतं.
गावाचं शहर होताना आणि वाढ होताना या सर्व मंडळीनी, " वाढ आणि विकास हातात हात घालून गेले पाहिजेत, गाव वाढताना मूलभूत सुविधा पहिल्यांदा योजून त्यानंतर बाकी विकास झाला पाहिजे", हे लक्षात नाही घेतलं तर काय होतं याची खूप छान उदाहरणं बघायला मिळतात, त्यातलं एक म्हणजे माझं डोंबिवली.
डोंबिवलीपुढचे प्रश्न अनेक आहेत. अनधिकृत बांधकाम, शासकीय आणि खासगी जमिनींवर झालेली अतिक्रमणं, फेरीवाल्यांनी ग्रासलेले रस्ते आणि फुटपाथ, सार्वजनिक वाहनतळांचा अभाव किंवा कमतरता, इमारतीमधे जागा वाचवताना न केलेले पार्किंग स्लॉट्स आणि त्यामुळे रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या गाड्या, बेशिस्त वाहनचालक, बेशिस्त आणि अलिप्त नागरिक, नैसर्गिक स्त्रोत आणि निसर्ग याबद्दल असलेली बेफिकीरी, हे आणि असे अनेक.
सर्वात महत्वाचं कारण म्हणजे शहराची वाढ होताना कुठेही नेते आणि प्रशासन यांचं "Vision" दिसत नाही.  शहर आपल्या हातात आहे, त्यामुळे त्याच्या भल्याची जबाबदारी आपली आहे, आपण योग्य निर्णय घेऊन सर्व गोष्टी नीट होतील हे पाहिलं पाहिजे हेच कोणत्याही नेतृत्वाच्या लक्षात येतंय की नाही की येऊनही काही अनाकलनीय कारणांमुळे दुर्लक्ष होतंय हे कळत नाही.
अनधिकृत बांधकाम आणि अतिक्रमण - शहरात अनधिकृत बांधकाम हे मोजता येत नाही एवढं पसरलंय. आधी नियमबाह्य कामं केली जातात. मग ती लोकांना विकली जातात. लोकसुद्धा हे जगातलं शेवटचं काम समजून विकत घेतात. नंतर कोणीतरी तक्रार करतं. मग ज्याच्यात्याच्या ताकदीप्रमाणे, तिथे लोक आधीच राहतात, त्यांचं नुकसान नको म्हणून, पैसे किंवा दंड भरून नियमित करून घेणं, लोकांना गरज आणि येताजाता सोयीचं म्हणून अनधिकृत फेरीवाल्यांकडे लोकांनी काणाडोळा करणं, वगैरे अनेक गोष्टी चालू आहेत.
मधेच कधीतरी कारवाई सुरु करून मग काही अनाकलनीय कारणाने मागे घेणं, परत तिथे अनधिकृत काम होणं, हे खेळ बघत आम्ही मोठे झालोय. फेरीवाल्यांच्या मागे लागणारी पालिकेची गाडी आणि ती पुढे गेल्यावर परत त्याच जागी बसणारे फेरीवाले हे तर नेहमीचं चित्र.
सर्वसामान्य लोकांची अडचण एकच आहे की त्यांची संघटना नाही, त्यामुळे दबाव गट नाही. आणि कायदेशीर काम करून देण्यात शासन आणि प्रशासन यांना लोकांना न सांगता येण्यासारख्या काही अडचणी असाव्यात.
डोंबिवलीतील सुशिक्षित बहुसंख्य नागरिक सुद्धा कामावरून येताना सोयीचं पडतं, किंवा घराच्या जवळ आहे म्हणून रस्त्यांवर, फुटपाथवर, जिथे जागा मिळेल तिथे असणाऱ्या फेरीवाल्यांकडून (रात्री उशीरा रेल्वे प्लेटफॉर्मवर सुद्धा) गोष्टी विकत घेतात आणि नंतर कचरा, गर्दी, वगैरे बद्दल आपापसात किंवा आता सोशल मीडियावर तक्रारी करतात. म्हणजे सोय हवी पण त्याचे परिणाम नकोत. मला सोयी हव्यात पण मला कर्तव्य वगैरे सांगू नका ही प्रवृत्ती.
पाणी प्रश्न - हा दुहेरी आहे. म्हणजे पिण्यासाठी आणि वापरासाठी लागणारं पाणी मिळणं हा एक भाग, आणि पावसाळ्यात नळाला नाही पण सोसायटी परिसर आणि रस्त्यांवर पाणी साठणं, तुंबून डबकी तयार होणं, त्यातून आरोग्याचे प्रश्न निर्माण होणं हा दुसरा महत्वाचा भाग. या दोन्ही प्रश्नांचं कारण मात्र एकच आहे, "नियोजनाचा अभाव".
आपलं झालंय काय की रोग वेगळाच आहे, आपण फक्त लक्षणं बघून त्यावर तात्पुरते उपाय करतोय पण रोग मुळापासून बरा व्हावा यासाठी काही करत नाहीये कारण ते जरा त्रासाचं (?) आहे.
पाण्याच्या नियोजनाबाबत आणि स्वयंपूर्णतेबाबत आपण किती जागरूक आहोत हे या क्षेत्रात गेली १५ वर्षं काम करत असल्याने मला चांगलंच अनुभवायला मिळतंय. या कालावधीत मी महाराष्ट्र, गोवा, मध्य प्रदेश, कर्नाटक, गुजरात या राज्यांत जलसंधारणाचे अनेक प्रकल्प राबवायला तांत्रिक मदत केली. २०० पेक्षा जास्त गावांत जल संधारण आणि मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे, वगैरे शहरांत ६५० पेक्षा प्रॉपर्टीज मधे "Rain water harvesting" साठी मदत केली. पण वाईट या गोष्टीचं वाटतं की माझ्या गावात मी अजुन एकही प्रकल्प नाही करू शकलो. अनेक वेळा लोकांसाठी मार्गदर्शन कार्यक्रम झाले, पालिका अधिकारी आणि सोसायटी पदाधिकाऱ्यांसाठी कार्यक्रम झाले, महापालिकेच्या इमारतींमधे आणि ३ मैदानांमधे काम करण्यासाठी सर्वे आणि रिपोर्ट देऊन झाले (आनंदाने आणि एकही पैसा न घेता), पण नक्की काय होतंय हेच कळत नाहीये, कोणीच काही प्रत्यक्ष काम करतंय असं काही दिसत नाहीये.
खरंतर शहरात "Rain water harvesting" सर्व सोसायट्या, मैदानं, शाळा, कॉलेज, हॉस्पिटल्स, इतर रहिवासी आणि व्यापारी आस्थापनं, इत्यादि ठिकाणी केलं, योग्य माणसाचा सल्ला घेऊन, योग्य माणसाकडून करून घेतलं, तर मला खात्री आहे की आजही पूर्ण गावाला ७/२४ पाणी मिळू शकतं. हे काम फार कठीण नाहीये पण बऱ्याच लोकांना वाटतं तितकं सोपं सुद्धा नाहीये हे लक्षात घेऊन काम केलं तर यश नक्की मिळेल. आणि चुकीचं काम नुकसान करू शकतं, त्यामुळे शहाण्या एक्सपार्टचा सल्ला घ्यावा. यासाठी प्रत्यक्ष कृतीची गरज आहे.
प्रदुषण आणि आपण - शहर वाढत गेलं तसं प्रदुषण वाढत चाललंय. यात वाहनांमुळे होणारं प्रदुषण आहेच पण ध्वनिप्रदूषण पण मोठ्या प्रमाणावर आहे. त्यात गाव आणि MIDC एकजीव झाल्याने ते प्रदुषण आहेच. आणि आपण भारतीय लोक नियम पाळण्यापेक्षा त्यातून पळवाटा काढणं, नियम मोडून नंतर विविध मार्ग आणि ओळखी वापरून कायद्यातून सुटणं, वगैरे प्रकारांत जास्त विश्वास ठेवत असल्याने यातून सुटणं हे सर्वांची वृत्ती बदलल्याशिवाय घडणं कठीणंच आहे.
माझ्यासाठी काही महिन्यांपूर्वी घडलेली घटना आणि त्यानंतर असलेला लोकांचा प्रतिसाद हे फारच धक्कादायक आहे. आपण सगळे स्वतःविषयी, आपल्या मुलाबाळांविषयी, त्यांच्या भवितव्याविषयी इतके बेफिकिर आहोत हे अजुन मानायला मन तयार होत नाहीये पण ही वस्तुस्थिती आहे. सर्वांना कदाचित अजुन आठवत असेल की MIDC मधे एका कंपनीत एक मोठा स्फोट झाला होता. त्यात जीवितहानी तर झाली होतीच पण मालमत्तेचं नुकसानही खूप झालं होतं. त्याविषयी काही काळ उलटसुलट चर्चा रंगल्या आणि नंतर लोक सगळं विसरून गेलेत की काय अशी परिस्थिती आहे सध्या. त्यातून MIDC अधिकारी, नागरिक, पालिका प्रशासन, सरकार, राजकीय पक्ष, सामजिक संघटना, डोंबिवलीत मोठ्या संख्येने असलेले विचारवंत, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माध्यमं, वगैरे काय शिकलेत, अशा घटना परत घडू नये म्हणून काय कृती आवश्यक आहे यावर काही बोललेत, चर्चा झाल्यात, काही प्रत्यक्ष कृति झालीय, यातलं काही घडल्याचं कळलं तरी नाही. एवढ्या मोठ्या घटनेबद्दल आपण सगळे एवढे शांत, निवांत, निष्क्रिय, अलिप्त राहू शकतो ही मोठी गोष्ट म्हणावी की आपली बेफिकीरी म्हणावी हे कळत नाहीये. त्यामुळे, या बाबतीत काही चांगलं घडेल असं मनात आणणं हा पण मला वेडा आशावाद वाटायला लागलाय.  
आपण आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी काय तयार करून आणि काय शिल्लक ठेवून जातोय याचा विचार प्रत्येकाने प्रमाणिकपणाने करायची गरज आहे. जे आपण निर्माण करू शकत नाही किंवा करत नाही त्याचा नाश आपण करत नाही याची दक्षता घेतली तरी खूप फायदा होईल.
नुसती चर्चा करून काही बदल होत नाहीत. म्हणून आपण काय करू शकतो हे खाली देतोय. यात स्थानानुरूप बदल होऊ शकतात.
आपण करण्यासारख्या गोष्टी -
१. विकास योग्य दिशेने आणि मार्गाने होण्यासाठी योग्य नियोजन आणि लोकसहभाग 
२. प्रत्येक सोसायटी, बाग, मैदान, हॉस्पिटल, शाळा, कॉलेज, व्यापारी आस्थापना, सरकारी मालमत्ता, वगैरे ठिकाणी योग्य सल्ल्याने, योग्य पद्धतीने "Rain water harvesting" करणे, आणि पिण्याच्या पाण्याव्यतिरिक्त बाकी पाण्यासाठी पालिकेवर अवलंबून न राहता ते आपल्या परिसरात मिळवणे 
३. शून्य कचरा व्यवस्थापन करणे, वृक्षतोड न करणे, नवीन झाडं लावणे आणि वाढवणे  
४. सार्वजानिक ठिकाणी शिस्त पाळण्याची सवय लावून घेणे (उदा. रस्ता ओलांडणे, वाहन चालवणे आणि पार्क करणे, कचरा टाकणे, वगैरे)   
५. प्लास्टिकचा वापर शक्य तितका टाळणे आणि शेवटी बंद करणे (विशेषतः पातळ carry bags)
६. स्वतः नियम, कायदे पाळणे आणि बाकीच्यांना पाळायला प्रोत्साहित करणे किंवा गरज पडल्यास भाग पाडणे
७. परिसरातल्या नागरिकांचा दबाव गट तयार करून सरकारी योजनांमधे लोकसहभाग वाढवणे 
८. सर्व नैसर्गिक स्त्रोतांचा वापर जपून करणे, शक्य तिथे पुनर्वापर करणे
योजना कितीही असल्या, कितीही चांगल्या असल्या, तरी त्या योग्य आणि यशस्वीपणे राबवण्यासाठी त्यात लोकांचा सहभाग खूप आवश्यक असतो. त्यासाठी सर्वांनी काही वेळ काढून या कामांत सहभागी होणं हे गरजेचं आहे हे कायम लक्षात ठेवून कामं केली तर निश्चित फायदा होईल. योग्य काम करायची इच्छाशक्ती आणि कृतिशीलता हे दोन गुण आणि लोकसहभाग हे आवश्यक आहे.
डोंबिवली हे नाव काढून इतर कोणत्याही गावाचं नाव टाकलं तरी हीच कथा सांगता येईल  अशी परिस्थिती आहे. आपल्याला सामुदायिक शहाणपण कधी येतंय यावर भवितव्य अवलंबून आहे.
(महाराष्ट्र टाइम्स, ठाणे प्लस, १. १. २०१७)