जलसंधारण करताना दीर्घकालीन चांगला परिणाम होण्यासाठी आणखी काय करायला हवं?
आज आकाशवाणी अस्मिता वाहिनीकडून फोन आला होता. महाराष्ट्रात पडलेला दुष्काळ आणि त्यावर चाललेले उपाय यावर मत काय हा प्रश्न विचारला आणि अजुन काय करणं आवश्यक आहे याबद्दल माझं मत विचारलं. माझं उत्तर खाली देतोय -
नद्यांचं खोलीकरण करणं जोरात चालू आहे. नदीतला गाळ काढणं हे अतिशय योग्य आहे. ते करायलाच हवंय. पण नद्यांचं सरसकट 3 मीटर, 6 मीटर खोलीकरण करणं आणि तेही सलग 5-7 किमी करणं थोडंसं धोक्याचं आहे.नदी ही एक परिसंस्था (ecosystem) आहे. आपण जास्तीत जास्त पाणी अडवण्यासाठी तिथे मोठी टाकी किंवा डोह तयार करतोय का याचा विचार काम करणार्या माणसांनी करायला हवा. आपण फक्त माणसाची गरज बघून पाणी साठवण्याचा विचार करतोय, निसर्गाच्या संतुलनाचा करत नाहीये.आज पाणी साठवून ठेवताना नदीचा नैसर्गिक उतार संपतोय, प्रवाहावर त्याचा परिणाम होणार आहे. नदी वाहती राहिली नाही तर त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतील.त्याचबरोबर, आपल्याकडे बहुतेक सर्व गावांमधे सांडपाणी नदीत सोडलं जातं. आता ते सांडपाणी प्रवाहाबरोबर निघून जातं. तिथे खोलीकरण करून पाणी साठवलं तर सर्व साठा प्रदूषित होण्याची भीती आहे. यावर ठोस उपाय होत नाही तोपर्यंत हा धोका कायमच आहे. यामुळे सर्व साठवलेलं पाणी आणि भूगर्भातील पाणी प्रदूषित होईल.दुसरा आणि अत्यंत महत्त्वाचा भाग आहे ज्याकडे बहुसंख्य लोकांनी दुर्लक्ष केलंय, तो म्हणजे, जलसंधारणाचे दीर्घकालीन फायदे हवे असतील तर आजपर्यंत जी बेसुमार वृक्षतोड झालीय त्यावर उपाय म्हणून मोठ्या प्रमाणावर झाडं लावून ती जगवण्याचे सर्व प्रयत्न करावे लागतील. जर झाडं लावली आणि वाढवली गेली नाहीत तर पुन्हा 2-3 वर्षांत बंधारे गाळाने परत भरून जातील.झाडं लावणं आणि जगवणं ही खूप कठीण गोष्ट येत्या 2-3 वर्षांत परिणामकारकरित्या करावी लागणार आहे. त्यामुळे मातीची धूपही कमी होईल आणि मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढेल.हे दोन्ही उपाय एकाचवेळी करण्याची गरज आहे. जलसंधारणाची कामं site specific असणं आवश्यक आहे. त्यामुळे सरसकट सर्वत्र एकाच प्रकारचं काम न करता, लोकसंख्या, पाणी साठवण्याची क्षमता, नदीच्या पात्राची रूंदी, खोली, आजुबाजुच्या परिसरातील शेतजमिनी आणि वस्त्यांचं प्रमाण, इत्यादि बाबींचा अभ्यास करून मग कामं केली तर कोणाचंच नुकसान न होता सर्वांचा फायदा होऊ शकतो.शहरांतही प्रत्यक्ष काम खूप कमी लोक करून घेताना दिसतायत. लोकांचा भर पाण्याबद्दलची चर्चा एकमेकांत, माध्यमांत आणि सोशल मिडीयावरच जास्त दिसतेय. यावर्षी पाऊस कमी झाल्यामुळे आणि आपल्याकडे पाणी वापरण्याचं आणि वाचवण्याचं नियोजन नसल्यामुळे पाण्याची गंभीर टंचाई निर्माण झालीय. यात एक गोष्ट चांगली आहे की गेली 2-3 वर्षं जलसंधारणाचे विविध प्रयत्न वेगगवेगळ्या संस्थांकडून, विविध पातळ्यांवर होतायत.
यावर्षी चालू असलेले प्रयत्न 2 प्रकारे आहेत, tanker किंवा अन्य मार्गाने पाणीपुरवठा करणं आणि विविध नद्यांचं खोलीकरण करणं.
बाकीही जलसंधारणाची कामं होतायत पण वर सांगितलेली कामं विशेष चालू आहेत. यातल्या पाणी पुरवठ्याच्या प्रयत्नांची गरज नक्कीच आहे. कारण लगेच पाणी देण्याचा दुसरा कोणताही परिणामकारक पर्यायी मार्ग नाहीये.
अजुन एक मुद्दा. नदी त्या भागातल्या सगळ्यात सखल भागातून वाहते. तिचं खोलीकरण करून अजुन 10-20 फूट खोल जाऊन आपण तो भाग अधिक सखल करतोय. त्यामुळे नदीतलं पाणी बाजुला जाईल की आजुबाजुला असलेल्या शेतांतलं पाणी उताराने खोल केलेल्या नदीत येईल? यावर कोणी विचार केलाय का? अशाने आजूबाजूच्या शेतातल्या विहिरी लवकर आटायची भीती निर्माण झाली आहे.
खोलीकरण करताना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की नुसतं खोलीकरण करून काही फार उपयोग नाही होणार. जर ठराविक अंतरावर योग्य जागा बघून छोटे बंधारे (जास्तीत जास्त ३-४ फूट उंचीचे) बांधले तर पाणी काही काळ थांबेल आणि मग ते आजूबाजूला जमिनीत जिरेल. अर्थात, त्यासाठी जागा बाजुओं खोलीकरण करणं आवश्यक आहे.
त्याचबरोबर, जे बंधारे बांधलेले आहेत पण पाणीगळती होतेय किंवा गाळाने भरलेले आहेत तिथेही योग्य पद्धतीने दुरूस्ती, बळकटीकरण आणि गाळ काढणं इत्यादि कामं केली पाहिजेत. शक्य तिथे योग्य जागी भूमिगत बंधारे बांधणे, झरे, ओढे, नद्या, तलाव, पाझर तलाव, इत्यादि प्रकारांनी जलसंधारण केलं पाहिजे.
पाण्याच्या स्वयंपूर्णतेकडे जायचं असेल तर हे लवकरात लवकर करावंच लागेल. अन्यथा, येणारा काळ आणखी बिकट असणार आहे.
फोटो - नदीचं खोलीकरण चालू असताना.
यात लोकसहभाग खूप महत्त्वाचा आहे. लोकसहभागाशिवाय यात दीर्घकालीन यश कठीण आहे.
शहरातल्या लोकांनीही हे लक्षात ठेवायला हवं की सध्या आपल्याला मिळत असलेलं पाणी हे आजुबाजुच्या ग्रामीण परिसरातून मिळतेय आणि अशीच परिस्थिती कायम राहिली तर दिवसेंदिवस शहराला होणारा पाणी पुरवठा कमी होत जाणार आहे. त्यामुळे फक्त या पाण्यावर अवलंबून भागणार नाही. आपल्या परिसरात पडणारं पााणी आपण जमिनीत जिरवून नंतर वापरू शकतो. त्यामुळे महापालिकेवर पिण्याव्यतिरिक्त पाण्यासाठी जास्त अवलंबून रहावं लागणार नाही. फक्त त्यासाठी केवळ चर्चा करून चालणार नाही, योग्य तज्ज्ञ व्यक्तींकडून योग्य ठिकाणी योग्य प्रकारे काम करावं लागेल.पाण्याच्या स्वयंपूर्णतेकडे जायचं असेल तर हे लवकरात लवकर करावंच लागेल. अन्यथा, येणारा काळ आणखी बिकट असणार आहे.
फोटो - नदीचं खोलीकरण चालू असताना.